पिंपरी चिंचवड : सत्तेचा माज उतरवण्याची ताकद शिवबंधनात आहे असे  वक्तव्य जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे.  ते पिंपरी चिंचवडमधील भूम पारंडा येथील रहिवासी मेळाव्यात बोलत होते. मुख्यमंत्री कोणाचा ? या प्रश्नावरून सध्या महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचे सुत्र ठरले असले तरी मुख्यमंत्री कोणाचा ? याचे उत्तर अजून गुलदस्त्यातच आहे. पण याच पार्श्वभुमीवर जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री नव्हेतर पंतप्रधान झालेलंही बघायला आवडेल असं सावंत म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद रॅली सध्या राज्यभरात सुरु आहे. या पार्श्वभुमीवर शिवसेनेतर्फे आदित्य ठाकरे यांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी असावा अशी शिवसेना नेत्यांची इच्छा आहे. त्यात आपणच पुन्हा मुख्यमंत्री होऊ असे देवेंद्र फडणवीस वारंवार सभांमध्ये सांगत आहेत. त्यामुळे सेना-भाजपामध्ये मुख्यमंत्री प्रश्नावरून शाब्दीक युद्ध पाहायला मिळत आहे. 



2014ला शिवसेना पक्षप्रमुखांना चक्रव्यूहात अडकवलं होते. मात्र सत्तेचा माज, मस्ती उतरवण्याची ताकद शिवबंधनात आहे असं म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला. 'नुसत्या धमक्या देऊ नका. एकला चलोरे हे आम्हीही ठरवलंय. उस्मानाबादचे ६ आमदार शिवसेनेचे असतील' असा इशाराही त्यांनी भाजपाला दिला आहे.