मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शिवसेनेचा मेळावा, स्वबळाची तयारी?
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात शिवसेनेची चाचपणी
नागपूर : विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या मात्र अजूनही भाजप-शिवसेना युतीबाबातचा निर्णय झालेला नाही..त्यामुळं एकीकडे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते संभ्रामात असताना आता मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शिवसेनेनं मेळावं घेत आपल्या ताकदीची चाचपणी करणं सुरु केलं आहे. आज नागपूर ग्रामीणमधील सावनेर विधानसभा मतदारसंघातील कळमेश्वर येथे शिवसेनेचा मेळावा झाला. नागपूर ग्रामीण अर्थात रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा खासदार आहे.
ग्रामीणधील रामटेक, काटोल, सावनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे. शिवसेना नागपूर ग्रामीणमधील सहाही विधानसभा मतदारसंघात मेळावे घेत आहे. युतीबाबतचा निर्णय जेव्हा होईल तेव्हा होईल शिवसेना नागपूर ग्रामीणमधील सहाही मतदारसंघात ताकदीनं तयारी करत असल्याचंही शिवसेना नेत्यांनी सांगितलं आहे.
युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आणि ती घटस्थापनेपर्यंत अंतिम टप्प्यातच राहणार आहे. नवरात्रीचे घट बसेपर्यंत युतीचे घट काही बसणार नाहीत. कारण युती जाहीर करण्यात पितृपक्षाचा अडसर आहे. आता युतीची चर्चा ही फक्त मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यातच सुरू आहे. पण २९ तारखेपर्यंत कुठलीही घोषणा होणार नाही. तोपर्यंत सुरू राहील तो फक्त टाईमपास आणि डायलॉगबाजी.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळीही हेच झालं. युतीच्या चर्चेचं गुऱ्हाळ पितृपक्ष संपेपर्यंत संपलं नाही. आणि घटस्थापनेला युतीचा घडा फुटला. आता पक्षांमध्ये काही जागा वगळता कुठलाही तिढा नाही, युतीसाठी शिवसेनेनं भाजपशी केव्हाच जुळवून घेतलं आहे. अजून उमेदवार जाहीर नाहीत, कुंपणावरचे अजूनही अस्वस्थ आहेत. पितृपक्ष संपल्याशिवाय युतीची घोषणा होण्याची शक्यता कमीच आहे.