मुंबई: विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असले तरी शिवसेना आणि भाजपमधील जागावाटपाची बोलणी प्राथमिक चर्चेच्या पलीकडे जाऊ शकलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जागावाटपासाठी आता नवे सूत्र समोर आणले आहे. त्यानुसार शिवसेनेने स्वत:साठी १२६ तर भाजपला १६२ जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, भाजपने शिवसेनेच्या या प्रस्तावाला ठामपणे नकार दिल्याचे समजते. त्यामुळे युतीमधील तणाव आणखीनच वाढला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

५० टक्के फॉर्म्युलानुसारच युती होईल - संजय राऊत


विशेष म्हणजे यापूर्वी झालेल्या बैठकांमध्ये भाजपने १६० पेक्षा अधिक जागांची मागणी केली होती. मात्र, आता शिवसेनेने त्यापेक्षा दोन जागा जास्त देऊनही भाजप अडून बसला आहे. त्यामुळे भाजपच्या मनात नेमके काय चालले आहे, याविषयी अनेकांनी नवे तर्क लढवायला सुरुवात केली आहे. 


लोकसभेप्रमाणं विधानसभेलाही युती होणार ?


नाशिकमध्ये गुरुवारी भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली होती. यावेळी युतीची घोषणा होणे अपेक्षित होते. मात्र, मोदींनी आपल्या संपूर्ण भाषणात युतीविषयी चकार शब्दही काढला नाही. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे ऐनवेळी युती तुटण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने १२२ तर शिवसेनेने ६३ जागांवर विजय मिळवला होता.


दरम्यान, ही शक्यता लक्षात घेऊन भाजप आणि शिवसेनेने यापूर्वीच स्वतंत्रपणे उमेदवारांच्या मुलाखती आणि प्रत्येक मतदारसंघातील ताकदीचा अंदाज घ्यायला सुरुवात केली होती. मात्र, स्वतंत्रपणे लढल्यास दोन्ही पक्षांना काही जागांचे नुकसना सहन करावे लागू शकते. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेतृत्त्वाकडून अजूनही युतीचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे.