Uddhav Thackeray : शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने रविवारी उशिरा अटक केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"संजय राऊत यांच्याबद्दल मला नक्कीच अभिमान आहे. कारण आजच्या राजकारणात बळाचा वापर सुरु आहे. बळ तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही इतरांना संपवण्याच्या मागे लागणार असाल तर दिवस हे सारखे नसतात. दिवस हे फिरतात. तुमचं काय होईल याचा विचार सुद्धा करणे भाजप आणि नड्डा यांनी करण्याची आवश्यकता आहे," असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.


"मी जे परवा सांगितले त्याला पुष्टी देणारे भाषण भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केले आहे. सर्वच लोकांनी आता डोळे आणि कान उघडे ठेवून आपला देश जिथे हे नेऊ इच्छितात ते होऊ देणे त्याच्यामध्ये सामान्य नागरिकाने ठरवण्याची वेळ आली आहे. लोक २० ३० वर्षे भाजपमध्ये येतात. भाजपसोबत लढणार पक्ष नाही. जे पक्ष संपले नाहीत ते संपतील आणि आपण टिकणार हे जे त्यांचे वक्तव्य आहे हे हुकूमशाहीकडे नेणारे आहे. भाजपचा वंश कुठून सुरु झाला हा महत्त्वाचा मुद्दा आहे," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.



सत्तेचा फेस गेल्यानंतर परिस्थितीची जाणीव होईल - उद्धव ठाकरे


"संजय राऊत माझे मित्र आहेत. संजय राऊत पत्रकार, शिवसैनिक आहेत आणि जे पटत नाहीये ते बोलत आहेत. मरण आले तरी शरण जाणार नाही हे त्यांचे वाक्य चांगले आहे. तेही शरण जाऊ शकले असते.  जे तिकडे गेले आहेत त्यांच्याभोवती सत्तेचा फेस आहे. तोपर्यंत ते आमच्यावर टीका करु शकतात. तो फेस गेल्यानंतर त्यांच्या परिस्थितीची जाणीव होईल," अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली आहे.


राजकारण आता घृणास्पद वाटायला लागलं आहे - उद्धव ठाकरे


हिटलरच्या काळातील परिस्थिती आज आपल्या देशात निर्माण झाली आहे. विरोधात कोणी बोललं तर त्याला अडकवायचचं. पण ठिक आहे न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. ही अटक बघितल्यानंतर मला असं वाटायला लागलंय की, नितीन गडकरी म्हणाले त्याप्रमाणे वाटायला लागलं आहे. राजकारण सोडण्याचा मुद्दा नाही पण ते आता घृणास्पद वाटायला लागलं आहे.



मुख्यमंत्री होतो पण माझ्या डोक्यात कधी हवा गेली नाही - उद्धव ठाकरे


पक्ष संपवायची हौस असेल तर जनतेसमोर जा आणि तुमचे विचार मांडा आणि त्यानंतर जनतेला जो काही निर्णय घेता येईल. आज सत्तेत बसलेल्यांनी बढाई मारण्यात अर्थ नाही.  मला अडीच वर्षे मी मुख्यमंत्री होतो पण माझ्या डोक्यात कधी हवा गेली नाही. कारण बाळासाहेब सांगायचे की सत्ता येते आणि जाते पण तू नम्र राहा. मी नम्र राहण्याचा प्रयत्न करत आलो आहे.


आज ज्यांच्या डोक्यात हवा गेली आहे त्यांना सांगू इच्छितो की निर्घूणपणाने वागू नका. दिवस आणि काळ हा नेहमीच सगळ्यांसाठीच चांगला असतो असं नाही. तो बदलत असतो, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.