मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्यात सध्या चर्चेत आहेत. त्यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात राजकीय भूकंप पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे जवळपास 35 आमदारांसोबत सुरतच्या एका हॉटेलमध्ये आहेत. एकनाथ शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीमुळे महाविकासआघाडी सरकार संकटात सापडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील जुन्या फळीतील नेते आहेत. त्यांना शिवसेनेत मोठं स्थान आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यांच्या नाराजी दूर करण्यात पक्षाला ही यश आलेलं नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या फोनवरुन चर्चेनंतर ही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.


काँग्रेस-राष्ट्रवादी (Congress-NCP) सोबतची युती तोडून पुन्हा भाजपसोबत हातमिळवणी करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळे शिवसैनिक देखील नाराज आहेत. मुंबईत त्यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. असं असलं तरी ठाण्यात मात्र शांतता पाहायला मिळत आहे.


एकनाथ शिंदे यांचं ठाणे जिल्ह्यात वर्चस्व आहे. ठाण्यातील अनेक नेते आणि शिवसैनिक शिंदे यांचं समर्थक आहेत. त्यामुळे ठाण्यात शांतता दिसत आहे. ठाण्यातील अनेक कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे यांचा जो आदेश असेल तो मान्य असेल असं देखील म्हटलं आहे.


एकनाथ शिंदे यांनी अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. ते शिवसेना सोडतील का? भाजपमध्ये प्रवेश करतील का अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण चित्र अजून स्पष्ट झालेलं नाही. भाजपकडून ही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे.