Sanjay Raut on Bachchu Kadu: प्रहार संघटनेचे अपक्ष आमदार बच्चू कडू (Prahar Sanghatna Bachchu Kadu) यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. अधिवेशनापूर्वी मोठी उलथापालथ होणार असून ठाकरे गट (Thackeray Faction) वगळता इतर पक्षातील 10 ते 15 आमदार फुटतील असा मोठा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. मात्र त्यांनी हे आमदार कोण असतील याचा खुलासा केला नाही. बच्चू कडूंच्या या दाव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 


बच्चू कडूंचा दावा काय आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिवेशनापूर्वी मोठी उलथापालथ होणार असून ठाकरे गट वगळता इतर पक्षातील 10 ते 15 आमदार फुटतील असा खळबळजनक दावा आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. मात्र यावेळी त्यांनी शिंदे गाटातील 20 ते 25 आमदार इकडे तिकडे झाले तरी सरकार मजबूतीने पूर्ण काळ टिकेल असाही दावाही केला आहे. 


पक्षप्रवेश आणि न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांमुळे मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख नेहमी पुढे जात आहे. मात्र पुढील 15 दिवसात अधिवेशनाच्या आधी मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होईल असे सूचक वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. 


संजय राऊतांची प्रतिक्रिया - 


संजय राऊत यांना प्रसारमाध्यमांनी बच्चू कडूंच्या दाव्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले "स्वतः बच्चू कडूही प्रवेश करत आहेत का? कोण काय बोलतं याकडे लक्ष देण्याची गरज नाही. माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार भाजपाचे काही आमदार प्रवेश कऱणार आहेत. त्यामुळे त्यांची माहिती योग्यच आहे"


मोदींच्या मुंबई दौऱ्यावर टीका 


संजय राऊत यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यावर टीका केली. मुंबई महापालिका निवडणूक तारीख ठरत नाही तोपर्यंत नरेंद्र मोदी यांचा मुक्काम मुंबईत राहील यात शंका नाही असा टोला यावेळी त्यांनी लगावला. मोदी कार्ड जरी वापरलं तरी मुंबईत शिवसेनाच येणार असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. 


"संसदेत अनेक महत्वाच्या घडामोडी सुरु असताना मोदी मुंबईत येतात. नरेंद्र मोदींना महापालिका जिंकायची आहे. हे मिंढे गटाचं स्पष्ट अपयश आहे," असं संजय राऊत म्हणाले. 
 
"राहुल गांधी यांनी अत्यंत सोपे प्रश्न विचारले. मोदींनी उत्तर का दिलं नाही? अदानींच्या मागे कोणती शक्ती आहे हे मोदींनी सांगावं. माझीही मागणी आहे की एकत्रित संसदीय समितीकडून अदानी प्रकरणाची चौकशी व्हावी," असं संजय राऊतांनी सांगितलं.