`भारत बंद`मध्ये शिवसेनेनं सहभागी व्हावं - काँग्रेस
काँग्रेसनं सोमवारी पुकारलेल्या `भारत बंद`मध्ये शिवसेनेनं सहभागी व्हावं, असं आवाहन केलेय.
पुणे : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसनं सोमवारी पुकारलेल्या 'भारत बंद'मध्ये शिवसेनेनं सहभागी व्हावं, असं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. काँग्रेसच्या संघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा आज पुण्यात समारोप होत आहे. यानिमित्त झी २४ तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत चव्हाणांनी हे आवाहन केले आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढ हा सर्वसामान्यांच्या चिंतेचा विषय आहे. त्यामुळे शिवसेनेनं बंदमध्ये सहभागी व्हायला हवं, असं मत चव्हाण यांनी नोंदवलंय.
हेच का अच्छे दिन? - शिवसेना
दरम्यान, पेट्रोल दरवाढ विरोधात औरंगाबादमध्ये शिवसेनेनं अनोखं आंदोलन केलं. पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॅनर लावले आहेत त्याच्याच बाजूला, शिवसेनेनं पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीचे बॅनर लावून हेच का अच्छे दिन? असा सवाल सरकारला केला.
शहरातल्या प्रत्येक पेट्रोल पंपावर अशाच प्रकारचे बॅनर लावून इंधन दरवाढीचा शिवसेनेनं निषेध केला. एवढ्यावरच न थांबता लोकांशी संवाद साधून भाजपा सरकारच्या काळामध्ये इंधनाचे दर कशा पद्धतीने वाढत आहेत हे सांगत, शिवसेनेनं इंधन दरवाढ विरोधात आंदोलन केलं.