विरार हादरलं! रिक्षाचालकाच्या मारहाणीत शिवसेना नेत्याचा मृत्यू; घटना कॅमेऱ्यात कैद
Shivsena Leader Death CCTV: कारच्या बोनेटला टेकून उभ्या असलेल्या या व्यक्तीने कोणाला काही कळण्याआधीच अचानक मान टाकली आणि ती व्यक्ती जागेवरच कोसळली.
Shivsena Leader Death CCTV: विरारमधील नवापूर येथील एका रिसॉर्टमध्ये ठाणे जिल्ह्याचे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. रविवार असल्याने कुटुंबाबरोबर रिसॉर्टला गेलेले शिवसेनेचे ठाणे उपजिल्हाप्रमुख 45 वर्षीय मिलिंद मोरेंचा मृत्यू होण्याच्या काही वेळाआधी त्यांचा स्थानिकांबरोबर किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. मात्र याच वादातून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांना मारहाण झाल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. पोलिसांनीही मिलिंद यांचा मृत्यू मारहाणीमुळेच झाल्याचं म्हटलं आहे.
अचानक चक्कर आली आणि मान टाकली...
विरारमधील नवापूर येथील रिसॉर्टमध्ये मिलिंद मोरे यांचा अचानक मृत्यू झाला. मृत्यूचं नेमकं कारण सुरुवातीला स्पष्ट झालं नव्हतं. विरारच्या 'सेवेन सी रिसॉट'मधील सीसीटीव्हीमध्ये मिलिंद मोरेंच्या मृत्यूचा घटनाक्रम कैद झाला आहे. स्थानिकांबरोबर पार्कींगमध्ये उभं राहून बोलत असताना मिलिंद अचानक चक्कर आल्याने कोसळले. कारच्या बोनेटला टेकून उभे असताना अचानक मलिंद मोरेंनी मान टाकली आणि ते खाली कोसळले. मिलिंद मोरेंना तात्काळ नजीकच्या प्रकृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र तेथे त्यांना मयत घोषित करण्यात आलं.
नक्की वाचा >> 'ममता बाहेर पडल्या, महाराष्ट्राचे CM मात्र दाढीवर हात फिरवीत...'; नीती आयोग बैठकीवरुन टोला
मारहाण कशामुळे झाली?
मिलिंद मोरे आपल्या कुटुंबासह सह 8 ते 10 जणांसोबत 'सेवेन सी रिसॉट'मध्ये आले होते. गाडी गेटमधून मागे पुढे करताना एक रिक्षाचा धक्का लागल्याने मोरे आणि या रिक्षावाल्यामध्ये भांडणं झालं. यावेळी रिक्षाचालकाने स्थानिकांच्या मदतीने मिलिंद आणि इतर दोघांना मारहाण केली. याच मारहाणीमुळे मिलिंद मोरेंचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. मिलिंद मोरे यांना मारहाण झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
नक्की वाचा >> 'तामिळनाडूचे मोदी' महाराष्ट्राचे नवे राज्यपाल... संयुक्त राष्ट्र, RSS कनेक्शन; सी. पी. राधाकृष्णन आहेत तरी कोण?
आनंद दिघेंनंतर ठाण्याचे जिल्हा प्रमुख राहिलेल्या रघुनाथ मोरे यांचे ते पुत्र होते. या घटनेमुळे मिलिंद यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.