युतीच्या घोषणेनंतर जालन्यातील शिवसैनिक आक्रमक; दानवेंचा प्रचार करण्यास नकार
शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे अनेक नेत्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.
जालना: शिवसेना आणि भाजप यांच्याकडून युतीची घोषणा झाल्यानंतर राजकीय समीकरणे कमालीची बदलली आहेत. शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे अनेक नेत्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र, आता युती झाल्याने शिवसेना आणि भाजप यांच्यापैकी एकाच उमेदवाराला निवडणूक लढवता येणार आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी पक्षातील कार्यकर्त्यांना नाईलाजाने दुसऱ्या पक्षाचा प्रचार करण्याची वेळ आली आहे. यामुळे अनेक ठिकाणचे शिवसैनिक नाराज झाले आहेत. जालन्यातही सध्या त्याचा प्रत्यय येत आहे. युती झाली तरी येथील शिवसैनिकांनी विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांचा प्रचार करायला स्पष्टपणे नकार दिला आहे. इतकेच नव्हे तर अर्जुन खोतकर यांना दानवे यांच्याविरोधात रिंगणात उतरवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी येथील शिवसैनिकांनी केली आहे.
शिवसेना-भाजप यांच्यातील वितुष्टाच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेविरोधात जोरदार मोहीम उघडली होती. त्यामुळे शिवसैनिकांचा त्यांच्यावर रोष आहे. शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकणाऱ्या दानवेंच्या विरोधात खोतकर यांना रिंगणात उतरवण्यासाठी येथील कार्यकर्ते आक्रमक आहेत. या पार्श्वभूमीवर खोतकर यांनीही दानवे यांच्याविरोधात अप्रत्यक्षपणे दंड थोपटले आहेत. युती झाली म्हणून काय झाले? मी अजून मैदान सोडलेले नाही, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे आता यावर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे काय तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना २३ आणि भाजप २५ जागांवर निवडणूक लढवणार आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा एक जास्त जागा शिवसेनेला सोडण्यात आली आहे.