माढ्यात पुन्हा मोहिते-पाटील? बबनराव शिंदेंसमोर शिवतेजसिंह यांचं आव्हान
Madha Assembly Elections : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे दुसरे पुतणे शिवतेजसिंह मोहिते पाटील हे माढा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत.
सचिन कसबे, प्रतिनिधी झी24 तास : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांना आता अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. अशातच आता माढा लोकसभेनंतर आता माढा विधानसभेच्या रिंगणात आणखी एका मोहिते पाटलांची एंट्री होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे दुसरे पुतणे शिवतेजसिंह मोहिते पाटील हे माढा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. शिवतेजसिंह मोहिते पाटील समर्थकांनी सोशल मीडिया हँडलवरून माढा विधानसभेच्या सर्वांगिण विकासासाठी शिवतेजसिंह मोहिते पाटील, अशा पोस्ट व्हायरल केल्या आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार बबनराव शिंदेंना शिवतेजसिंहांचं आव्हान मिळण्याची शक्यता आहे.
कोण आहेत शिवतेजसिंह मोहिते-पाटील?
शिवतेजसिंह मोहिते-पाटील हे विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे आणि अकलूजचे माजी सरपंच असून त्यांनी लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सांभाळली होती. माढा विधानसभा मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे. तसेच ते शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनीचे एमडी आहेत.
बबनराव शिंदे यांच्यासमोर मोठं आव्हान?
माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी एन्ट्री करत जोरदार विजय मिळवला. तर विधानसभेला आता शिवतेजसिंह मोहिते पाटील माढ्याच्या आखाड्यात उतरण्यासाठी सज्ज झालेत. त्यानमुळे विद्यामान आमदार बबनराव शिंदे यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण झालंय. जर बबवराव यांच्या ऐवजी त्यांचे पूत्र रणजितसिंह शिंदेंना उमेदवारी मिळाली तर दोन युवा नेत्यांमध्ये माढा विधानसभेचा सामना रंगण्याची शक्यता आहे.