तीन सख्ख्या भावांचा विहिरीत शॉक लागून मृत्यू
नातेवाईकांचा महावितरण कंपनीवर रोष
जालना : जालन्यातील पळसखेडा पिंपळे या गावातील ३ सख्ख्या भावंडांचा विहिरीत पडून मृत्यू झालाय.आज भल्या पहाटे ही दुर्घटना घडली.या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त केल्या जातीय.विजेचा शॉक लागून या तिन्हीही सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतीय.
ज्ञानेश्वर जाधव वय 28 वर्ष,रामेश्वर जाधव वय 25 वर्ष आणि सुनील जाधव वय 18 वर्ष जालन्यातील पिंपळगाव पिंपळे गावातील या तिन्हीही सख्ख्या भावंडांचा आज भल्या पहाटे विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.या घटनेमुळे जाधव कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलाय. जाधव भांवंडांच्या अशा अकाली मृत्युमुळे त्यांचे आई,वडील आणि आजीच्या डोळ्यातील पाण्याच्या धारा थांबता थांबत नाहीय.आज भल्या पहाटे हे तिन्हीही भाऊ रात्र पाळीची वीज असल्यानं शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते.पण आज भल्या पहाटे तिघांचेही मृतदेह विहीरीतील पाण्यात आढळून आले.
मयत भावांपैकी सर्वात मोठा असलेला ज्ञानेश्वर हा शेती करायचा.दुसरा रामेश्वर हा औरंगाबादमध्ये शिक्षण घेत होता.तर सर्वात लहान भाऊ सुनील हा 12 वीत शिकत होता.या घटनेनंतर मयत भावंडांच्या नातेवाईकांनी महावितरण कंपनीवर ठपका ठेवलाय.महावितरण कंपनीने रात्र पाळीची लाईन न देता दिवसभरात 6 तास जरी वीज दिली तर ही वाईट वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही असं सांगत या तिघा भावंडांच्या मृत्यूबाबत घातपाताची शक्यताही व्यक्त केलीय.या भावंडांच्या मृत्यूची चौकशी करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली.
या घटनेमुळे जाधव कुटुंब हतबल झालय.कुटूंबातील सदस्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहतायत.सख्ख्या 3 भावंडांचा मृत्यू जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.गावकरी आणि नातेवाईकांमधून हळहळ व्यक्त केल्या जातीय. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना दिवसा वीज वाटप करण्याचं नियोजन केलं असतं तर आज हे तिघेही भावंडं गमावण्याची वेळ जाधव कुटूंबावर आली नसती हेही तेवढंच खरंय.