संतापजनक प्रकार : देवऋषीकडून उपचार देताना १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू
महाराष्ट्रातील अंधश्रद्धेचा चौथा बळी
मुंबई : महाराष्ट्रातील साताऱ्यात (Satara Girl died due to supersition) अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. या प्रकारावर ऊत्तम अवघडे आणि रामचंद्र सावंत या दोन भोंदू वर जादूटोणा विरोधी कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पुन्हा एकदा अंधश्रद्धेची बाब समोर आली आहे.
देवऋषीकडून तापावर उपचार करताना एका चौदा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मुलीच्या आई वडिलांनीच परस्पर मृतदेह पुरला आहे. साताऱ्यातल्या दहिवडी इथळ्या शिंदी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. मुलीला ताप आला म्हणून तीचे कुटुंबीय गोंदवले इथल्या देवऋषीकडे उपचारासाठी तिला घेऊन गेले होते. यावेळी मुलीला भूत लागल्याचं सांगत भोंदूबाबांनी जादूटोणा केला. मात्र दुर्दैवानं मुलीचा मृत्यू झाला.
याप्रकऱणी भोंदूबाबा उत्तम अवघडे आणि रामचंद्र सावंतविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही भोंदू बाबांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा प्रकार समजताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीनं कारवाईची मागणी करण्यात आली होती. त्याचसोबत मुलीच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्याची मागणी करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यापासून अंधश्रद्धेमुळे गेलेला हा चौथा बळी आहे. याआधी जळगावमध्ये एका साप चावलेल्या मुलीला मांत्रिकाकडे नेल्यामुळे तिचा बळी गेला. तसेच 8 महिन्याची गर्भवती महिला देखील अंधश्रद्धेला बळी पडली असून तिचा मृत्यू झाला आहे.