सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : एका चोराने चोरीची हद्दच पार केली. यामुळे तब्बल 69 नवजात बालकांचा जीव धोक्यात आला होता. ही संतापजनक घटना पंढरपूरमध्ये उघडकीस आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंढरपुरमधल्या प्रसिद्ध बालरोग रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात नवजात बालकांना ठेवण्यात आलं होतं. 


पंढरपूरमध्ये डॉ शितल शहा यांचं नवजीवन हॉस्पिटल आहे. इथं नवजात बालकांवर उपचार केले जातात. काल सकाळी रुग्णालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या जनरेटर जवळ मोठा आवाज झाला. रुग्णालयात असलेल्या इलेक्ट्रिशयनच्या लक्षात ही गोष्ट आली. त्याने तात्काळ जनरेटरच्या दिशेने धाव घेतली. 


यावेळी एक व्यक्ती जनरेटरची बॅटरी काढून पळ काढताना दिसला. चोराने बॅटरी काढल्याने जनरेटर बंद झाला. त्यामुळे अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या 69 बालकांचा जीव धोक्यात आला. काही क्षण एकच धावपळ उडाली. पण इलेक्ट्रीशयन युवराज सावंत आणि इतर कर्मचाऱ्यांनी चोराला शोधण्याचा प्रयत्न केला. पण तो झुडूपाचा आधार घेत पळून गेला. 


प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेत डॉक्टर शितल शहा यांनी तात्काळ पर्यायी व्यवस्था केली आणि वॉर्डातील बालकांच्या जीवावरील धोका टळला. जनरेटरवर चालणारं व्हेंटिलेटर पूर्ण बंद पडलं असतं तरी मोठं अघटीत घडलं असतं. 


दरम्यान बॅटरी चोराविरोधात पंढरपूर शहर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात आली आहे.