COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशाल करोळे, झी २४ तास, औरंगाबाद : तळहाताच्या फोडासारखं आईवडिल मुलांना जपतात पण आईवडिल म्हातारे झाले की मुलं कृतघ्नांसारखं त्यांना अडगळीत टाकतात. औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटल तर सोडून दिलेल्या आईवडिलांचं वृद्धाश्रम झालंय.औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटलच्या आवारात फिरणाऱ्या एका आजींना त्यांचं नावही आठवत नाहीय. आजींना त्यांच्या मुलानं उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. आजी बऱ्या झाल्या पण मुलगा परत आला नाही. हॉस्पिटलच्या आवारात अशा फिरणाऱ्या आजी एकट्या नाहीत. 


आवारात त्यांच्यासारखे 200 पेक्षा जास्त वृद्ध बेवारस स्थितीत आहेत. कुणीतरी दिलं तर खायचं नाहीतर पडून राहायचं. घाटी हॉस्पिटलचं आवार जणू वृद्धाश्रमच झाल्याचे सेवाभावी संस्था सदस्य सुमीत पंडीत यांनी सांगितले. वृद्धांना हॉस्पिटलमध्ये सोडून जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याचं घाटी प्रशासनाचं म्हणणं आहे.


बेवारस वृद्धांमध्ये ग्रामीण भागातील मुलांनी सोडलेल्या आईबाबांची संख्या अधिक आहे. म्हाताऱ्या आईवडिलांना मरण्य़ासाठी वाऱ्यावर सोडण्याचा हा प्रकार क्लेशकारक म्हणावा लागेल. आईबाबांच्या मदतीला आपणं पुढं यावं हेच आवाहन झी २४ तास करतंय.