अभिषेक अदेप्पा (झी मराठी मिडिया, सोलापूर): देशभरामध्ये सुरु करण्यात आलेली 'वंदे भारत' ही प्रिमिअर रेल्वे महाराष्ट्रात अनेक मार्गांवर चालवली जाते. मात्र महाराष्ट्रातील एका वंदे भारत ट्रेनवर दगडफेक (Shocking News About Vande Bharat) करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोलापूरमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. सोलापूरमध्ये ही घटना घडली आहे. जिल्ह्यातील जेऊरजवळ वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. दगडफेकीमध्ये वंदे भारत एक्सप्रेसच्या सी-11 डब्ब्याची काच फुटली आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. मात्र ही दगडफेक कोणी आणि का केली याबद्दलची माहिती अद्याप मिळालेली नाही. स्थानिक पोलीस आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून यासंदर्भातील तपास केला जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अशाप्रकारे वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र आता महाराष्ट्रामध्येही अशी दगडफेक करण्यात आल्याने खरोखरच या बाबतीतही महाराष्ट्राचा युपी, बिहार झालाय का असा प्रश्न विचारला जातोय.


प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण


अचानकपणे वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना घडल्याने काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. कोणीतरी हुल्लडबाजी करत, कोणी गर्दुल्ल्याने दगडफेक केली का? की अन्य कोणते कारण आहे  याचा शोध आता रेल्वे पोलिसांकडून घेतला जात आहे.


महाराष्ट्रात कोणत्या मार्गावर धावतात वंदे भारत


महाराष्ट्रामध्ये शेवटची नवी वंदे भारत सप्टेंबर महिन्यामध्ये सुरु करण्यात आली. 16 सप्टेंबर 2024 रोजी नागपूर-सिकंदराबाद, कोल्हापूर-पुणे, पुणे-हुबळी या तीन मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आल्या. याशिवाय महाराष्ट्रामध्ये मुंबई-सोलापूर, मुंबई- साईनगर शिर्डी, मुंबई सेंट्रल-गांधीनगर, मुंबई सीएसएमटी-मडगाव, इंदूर-नागपूर, अहमदाबाद-मुंबई या मार्गांवर एक्सप्रेस ट्रेन धावतात. विशेष म्हणजे देशातील सर्वाधिक वंदे भारत एक्सप्रेस असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. मात्र असं असतानाही सोलापूरमध्ये अशी घटना घडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.