धक्कादायक, मतदान केले नाही म्हणून कुटुंबाला टाकले वाळीत
ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनेलला मतदान केले नाही. यामुळे एका कुटुंबाला जातीबाहेर काढून वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनेलला मतदान केले नाही. यामुळे एका कुटुंबाला जातीबाहेर काढून वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील तळवाडे गावात घडला आहे. तळवाडे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात तक्रारदार शरद पाटील यांनी रामकृष्ण पाटील यांच्या पॅनलला मदत न करता युवराज पाटील यांच्या पॅनलला मदत केली. त्याचा राग मनात ठेऊन संशयित आरोपींनी संगनमताने शरद पाटील यांच्या कुटुंबाला जातीबाहेर काढले.
मानवी हक्क तसंच नैसर्गिक तत्वानुसार असलेले सर्व रोटी, बेटी व्यवहार देखील बंद केले. सामाजिक तसंच आर्थिक पिळवणूक करत शाळा, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यास प्रतिबंध केला. ६ मे रोजी शरद पाटील यांच्या भाऊबंदकीत विवाह सोहळा होता. या विवाह सोहळ्यात तसेच ७ मे रोजी पार पडलेल्या अक्षय्य तृतीयेच्या सणावेळी पाटील यांना वाळीत टाकण्यात आले. याप्रकरणी शरद पाटील यांनी विभागीय महसूल आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली. त्यानंतर शरद पाटील यांनी मारवड पोलिसात फिर्याद दाखल केली.
त्यानुसार महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण अधिनियम २०१६ प्रमाणे जातपंचायत कायद्यानुसार संशयित आरोपी कौतिक तोताराम पाटील, सरपंच रामकृष्ण अभिमन पाटील, मनोहर श्रीराम पाटील, नाना शिवराम पाटील, राजेंद्र विठ्ठल पाटील, श्रीराम महिपत पाटील, समाधान नाना पाटील, बापू मोतीराम पाटील, चतुर बापू पाटील, किशोर नाना पाटील, अशोक श्रीराम पाटील, नंदलाल कौतिक पाटील, मगन रामदास पाटील, सुदाम अभिमन पाटील, लोटन अभिमन पाटील, हिम्मत अभिमन पाटील, शिवाजी अशोक पाटील व नामदेव कौतीक पाटील (रा. तळवाडे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे कारण पुढे करत पोलिसांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.