6 आयटी इंजिनिअरची दारू पिऊन पोलिसांना धक्काबुकी
कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार
मुंबई : दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या 6 आयटी इंजिनिअर्स तरूणांना चांगलेच महागात पडले आहे. ही घटना पुण्यातील हडपसर भागातील अमनोरा पार्क येथील सोसायटीत घडली आहे. तेव्हा सोसायटीतील नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र दारूच्या नशेत धुंद असलेल्या या आयटी तरूणांनी पोलिसांनाच धक्काबुक्की केली आहे. हा सगळा प्रकार 19 मे रोजी शनिवारी घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमनोरा पार्कयेथील व्ही कंट्री टॉवर या सोसायटीत आयटी इंजिनिअर रोहित वांगणू राहतो. त्याच्या फ्लॅटमध्ये शनिवारी त्याचे पाच मित्र पार्टीसाठी जमले होते. रात्री उशिरा दारू पिल्यानंतर त्यांनी तेथे गोंधळ घालण्यास सुरूवात केली. यानंतर सोसायटीतील लोकांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली. यानंतर दोन पोलिस कर्मचारी तेथे गेले असता या सहा आयटी इंजिनियरनी त्यांना धक्काबुक्की केली. यावेळी हे सर्व तरूण दारूच्या नशेत होते. पोलिसांना धक्काबुकी झाल्यानंतर त्यांनी ही बाब आपल्या वरिष्ठांच्या कानावर घातली. त्यानंतर तेथे आणखी काही पोलिस कर्मचारी आले व नशेत धुंद असलेल्या तरूणांना अटक करून घेऊन गेले.
या सगळ्या प्रकरणात रोहित वांगणूसोबत इतर 5 आयटी इंजिनिअर्सना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा बॅचलर राहणाऱ्या मुलांच्या राहणीमानावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. अनेकदा सोसायटी फक्त तरूणांना किंवा तरूणींना भाडेतत्वावर फ्लॅट देत नाहीत.