अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर : नागपूर जिल्ह्यातल्या नरभक्षक वाघिणीला ठार करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवलेत. या वाघिणीने आजवर अनेक जीव घेतले आणि अनेकांना जखमी केल्याचा दावा करत वन विभागाने तिला ठार मारण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या विरोधात वन्य जीव प्रेमिंनी दाद मागितली होती. पण आता न्यायालयानं वाघिणीला ठार मारण्यावर शिक्कामोर्तब केलंय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपुरातल्या ब्रह्मपुरीत गेले चार-पाच महिने या वाघिणीची भयानक दहशत आहे... ही वाघीण मूळची चंद्रपूरमधल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातली.... T-27-C-1 या क्रमांकानंच ती ओळखली जाते... ब्रह्मपुरीतल्या चौघांना तिनं हल्ला करुन ठार केलं, अनेकांना जखमी केलं आणि अनेक पाळीव प्राण्यांचाही फडशा पाडलाय. त्यामुळेच या नरभक्षक वाघिणीला ठार करण्याचे आदेश जून महिन्यात वनविभागानं दिले होते. पण वाघिणीला बेशुद्ध करत दुसरीकडे सोडण्याचे आदेश न्यायालयानं दिले. त्यानुसार वाघिणीला बेशुद्ध करत वर्धा जिल्ह्यातल्या बोर व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलं. 


- २९ जुलैला वाघिणीला रेडिओ कॉलर लावून बोर व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलं


- थोड्या दिवसांनी ती नागपूर जिल्ह्याच्या काटोल-नरखेड तालुक्यात पोहोचली


- जंगल, टेकडी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ - असा प्रवास या वाघिणीनं केला


- गेल्या ७६ दिवसांत तब्बल ५०० किलोमीटरचा प्रवास करत ती आता परत वर्ध्यातल्या बोर प्रकल्पात दाखल झालीय


- या पाचशे किलोमीटरच्या प्रवासातही तिनं अनेक माणसांवर हल्ले केलेत


या वाघिणीचा धुमाकूळ लक्षात घेता वनविभागानं आता तिला ठार करण्याचे आदेश पुन्हा दिलेत. त्याला वन्यजीवप्रेमींनी न्यायालयात आव्हान दिलं. पण न्यायालयानं वाघिणीला ठार करण्याचे आदेश कायम ठेवलेत. न्यायालयाच्या या निर्णयानंतर वन्यप्रेमी मात्र नाराज झालेत. 


विशेष म्हणजे, या वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी मनेका गांधींनी थेट दिल्लीहून तज्ज्ञ पाठवला होता. पण हा तज्ज्ञही वाघिणीला बेशुद्ध करायला अपयशी ठरलाय. गेले कित्येक दिवस ही वाघीण सगळ्यांना गुंगारा देत फिरतेय... तिला ठार मारण्याचे न्यायालयानं दिलेले आदेश दूरगामी परिणाम करणारे ठरणार आहेत. कारण यापुढे देशात कधीही वाघिणीला ठार करण्याचा प्रश्न येईल, त्यावेळी न्यायालयानं दिलेला हा निकाल दाखला म्हणून वापरला जाणार आहे.