वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार झाला आहे. क्रिकेट खेळण्यावरून दोन गटात झालेल्या मारामारीत मध्यस्थी करण्याच्या प्रयत्न पाटील यांनी केला. त्यामुळे राजपूत गटाच्या चार जणांनी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार केला. या धक्कादायक घटनेमुळे जळगावात एकचं खळबळ माजली आहे. सुदैवाने या गोळीबारात कुलभाषण पाटील यांना काही झालेलं नाही. घटना त्यांच्या राहत्या घरा जवळ म्हणजेच पिंपराला येथील मयूर कॉलनी परिसरात घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी दुपारी खोटे नगर परिसराजवळ असलेल्या मैदानावर नितीन राजपूत आणि महेंद्र राजपूत या दोघांमध्ये क्रिकेट खेळण्या वरून जोरदार वाद उफाळून आला. हा वाद सोडविण्यासाठी दुपारच्या सुमारास उपमहापौर कुलभाषण पाटील गेले. त्यावेळी या दोघांतील वाद मिटविण्यास कुलभूषण पाटील यांना यश मिळाले. 


मात्र दोन तासानंतर एका इनोव्हातून आलेल्या चार जणांनी रस्त्यावरचं कुलभूषण पाटील यांना अडवून भांडणात मध्यस्थी का केली अशी विचारणा केली आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला.  यावेळी गाडीतील एकाने सोबत आणलेल्या बंदुकीतून कुलभूषण यांच्यावर गोळीबार केला.  मात्र नेम चुकल्याने ते बचावले. 


यावेळी कुलभूषण यांनी आपल्या राहत्या घराच्या मागे पळ काढून स्वतःचा बचाव केला.  गोळीबार करणारे हे सर्वजण उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या परिचयाचे आहेत.


उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात जळगाव शहरातील रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. राजपूत गटात झालेल्या वादात मध्यस्थी केल्याचा वादातून हा हल्ला झाल्याची पोलीस सूत्रांची प्राथमिक माहिती आहे. 


या घटनेच्या संदर्भात अद्याप कोणालाही अटक अथवा ताब्यात घेण्यात आलेले नसले तरी संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली आहे.