Maharashtra School : लहान मुलांची झोप पूर्ण होण्यासाठी महाराष्ट्रातील शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. राज्यातील शाळा सुरू होण्याची वेळ ही सातवरुन नऊ करण्यात आली आहे. सर्व माध्यमांच्या तसंच सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 वाजल्यानंतर भरवण्याचे परिपत्रक (GR) राज्य सरकारने जारी केलं होतं. मात्र, अनेक शाळा नियम करुनही नऊपूर्वी भरवत असल्याचे समोर येत आहे. यावर आता शिक्षणाधिकाऱ्यांनी कठोर पावलं उचलली आहेत. सकाळी नऊपूर्वी भरणाऱ्या शाळांना कारणे दाखवा नोटिस बजावली जाणार आहे. शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी लवकर शाळा असल्याने विद्याथ्यांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने शाळेची वेळ बदलण्याचा विचार शिक्षण विभागाकडून करण्यात येत होता. त्यानंतर राज्य सरकारने चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला. पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी 9 किंवा 9 नंतर ठेवावेत असे आदेश देण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारचे आदेश असतानाही काही खासगी शाळा सकाळी सात वाजता भरवत होते. काही शाळांनी शासनाच्या आदेशाचे पालन केलेले नसल्याचे दिसून येत होते. त्यामुळे शिक्षण विभागाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. 


शिक्षण विभागाच्या दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत इतर विषयांबरोबरच शाळेच्या वेळेच्या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबतही चर्चा झाली.  त्यावेळी ‘राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या चौथीपर्यंतच्या शाळा शासनाच्या निर्णयानुसार सकाळी नऊनंतरच भरवणे आवश्यक आहे. सकाळी नऊपूर्वी शाळा भरवायची असल्यास संबंधित शाळांनी सबळ कारण देऊन शिक्षणाधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेतली पाहिजे. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यातील शाळांच्या वेळेची माहिती घेण्याच्या, तसेच परवानगी न घेता सकाळी नऊपूर्वी भरणाऱ्या शाळांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच, शासनाच्या आदेशाचे पालन योग्य रीतीने होणे आवश्यक आहे. तसे होत नसल्याचे निदर्शनास आल्यास शिक्षणाधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाणार आहे.


सरकारचा निर्णय काय?


राज्यपाल रमेश बैस यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केली होती. राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांपैकी काही शाळा विशेषतः खाजगी शाळा भरण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी 7 नंतर असल्याचं दिसून येतं. पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात.सकाळी लवकर शाळा असल्याने विद्याथ्यांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसलेले दिसून येतात. त्यामुळे बऱ्याचदा अभास्यासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी असलेला दिसून येतो. ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो. त्यामुळं शाळांची ही वेळ नऊपर्यंत पुढे नेल्यास मुलांची झोप पूर्ण होऊन शिकण्यात लक्ष लागेल तसंच पालकांची सकाळी पाच वाजल्यापासून होणारी धावपळ कमी होईल.