विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : आईवडिलांची सेवा करणाऱ्या श्रावणबाळाची कथा आपण ऐकली असेल. पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ती कहाणी आहे, एका श्रावणकन्येची. रूग्णालयात अंथरूणाला खिळलेल्या आईची सेवाशुश्रुषा करणारी ही अवघी 10 वर्षांची मुलगी. ही आहे औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयातील ह्दयाला पाझर फोडणारी कहाणी. दवाखान्यात आईच्या बाजूला चिंताग्रस्त चेह-यानं बसलेली ही अंजली शिंदे. वय वर्षं अवघं दहा. पण या लहानग्या वयात तिनं दाखवलेली हिंमत अगदी मोठ्यांनाही लाजवणारी आहे. 


कौटुंबिक वादातून स्वतःला जाळून घेतलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंजलीच्या आईनं सुवर्णा शिंदे हिनं सहा महिन्यांपूर्वी कौटुंबिक वादातून स्वतःला जाळून घेतलं. त्यात त्या 50 टक्के भाजल्या. औरंगाबादच्या शासकीय रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. सुरूवातीला काही दिवस नातेवाईक यायचे. पण मग त्यांनीही पाठ फिरवली. त्यामुळं आपल्या आईला सांभाळण्याची जबाबदारी कोवळ्या अंजलीवर आली. केवळ आईच नाही, तर दोघा लहान भावंडांचीही ती माऊली बनली.


ज्या वयात खेळायचं, बागडायचं, त्या वयात


ज्या वयात खेळायचं, बागडायचं, त्या वयात ही निरागस मुलगी ,आपल्या आईची सेवा करताना दिसतेय. आईला जेवू घालणं, तिची साफसफाई राखणं, आईच्या जळालेल्या शरीरावर मलमपट्टी करणं आणि काही लागलंच तर डॉक्टरांना बोलावणं, अशी सगळी कामं अंजली मनापासून करत आहे.


अंजली दिवसरात्र आईच्या सोबत


अंजली दिवसरात्र आईच्या सोबत असते. तिचे दोन लहान भाऊही तिच्याजवळच असतात. तिथंच खेळतात, जेवतात आणि झोपतात. आपापल्या परीनं आईची सेवा करतात. या मुलांची आईसाठीची धडपड पाहून रुग्णालयातील कर्मचा-यांनाही गहिवरून येतं.


केके ग्रुप सुवर्णा शिंदे यांना मोफत औषधं पुरवत


खरं तर उपचार झाले की, रुग्णाला घरी पाठवलं जातं. पण जळालेल्या सुवर्णा शिंदेंची काळजी घ्यायला कुणीही नसल्यानं या सरकारी रुग्णालयानं सगळे नियम बाजूला ठेवून, तिला रुग्णालयातच ठेवलं आहे. घाटीत समाजसेवी काम करणारा केके ग्रुप सुवर्णा शिंदे यांना मोफत औषधं पुरवत आहे.


सहा महिन्यापासून शाळेत गेलेली नाहीत


गेल्या सहा महिन्यांपासून अंजली आणि तिची भावंडं शाळेत गेलेली नाहीत. नातेवाईकांनी पाठ फिरवल्यानं या तिघांचं आयुष्य एका वेगळ्याच वळणावर आलं आहे. त्यांची धडपड आहे ती आपल्या आईला वाचवण्याची. एवढ्याशा वयात आईची सेवा करणा-या या श्रावणकन्येच्या धडपडीला झी 24 तासचा सलाम.