मुंबई : जर युती झालीच तर पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने आपल्या वाट्याला घ्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या श्रीनिवास चिंतामण वनगा यांनी केली आहे. पालघरची लोकसभा पोटनिवडणूक शिवसेना आणि भाजपमध्ये चुरशीची झाली होती. यामध्ये शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांचा पराभव झाला होता. त्यामुळेच ही जागा शिवसेनेने आपल्या वाट्याला घेतल्यास तिथून निवडणूक लढवणार असल्याचे वनगांनी सांगितलं. त्यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या कुटुंबियांनी पोटनिवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केला होता. भाजपने दुर्लक्ष केल्याने त्यांनी शिवसेनेची वाट धरली होती. पालघर पोटनिवडणुकीत भाजपनं वनगा यांच्या कुटुंबीयांकडे दुर्लक्ष केल्याची खंत त्यांनी त्यावेळी बोलून दाखवली होती. 


माजी खासदार अॅड. चिंतामण वनगा यांचं वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं होतं. वनगा यांनी आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी काम केलं. आदिवासी परिसरात भाजपचे मतदार वाढवण्यात वनगांचा मोठा वाटा होता. विविध प्रकल्प तडीला नेण्यात वनगांची मोठी भूमिका बजावली होती. विरार डहाणू लोकल सेवा सुरू करण्यासाठी वनगांनी खूप प्रयत्न केले. ठाणे जिल्हाच्या विभाजनाच्या आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. १९९६, १९९९ आणि २०१४ मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली तर २००९ मध्ये विक्रमगडमध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवून आमदारकी मिळवली होती.