गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यापलिकडे गेले आहेत. मात्र याचा केवळ ग्राहकांनाच नाही तर उद्योगांनाही फटका बसू लागला आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या वाहन खरेदीत घट होत असल्याचं दिसू लागलं आहे. तर दुसरीकडे सीएनजी आणि इलेक्ट्रीक वाहनांच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


गेल्या डिसेंबरमध्ये पेट्रोलचे दर प्रति लीटर 89 रुपये होते. आता त्यात वाढ होऊन मार्चमध्ये ते 97.57 रुपयांवर पोहोचलेत...देशातल्या काही शहरांमध्ये तर पेट्रोलच्या दरांनी शंभरीही गाठली आहे. आणि म्हणूनच पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यानं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. परिणामी याचा मोठा फटका वाहन उद्योगालाही बसलाय. परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या विक्रीत कमालीची घट झालीय.


पेट्रोल दरवाढीनं वाहन उद्योगाला कसा फटका?



राज्यात डिसेंबर 2020मध्ये पेट्रोलवर चालणाऱ्या 2 लाख 10 हजार 715 वाहनांची विक्री झाली होती.
याउलट 2021च्या जानेवारीत वाहन विक्रीचा आकडा 1 लाख 66 हजार 72 वर घसरला.
फेब्रुवारीत ही संख्या 1 लाख 49 हजार 820 वर आली.


पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी आणि इलेक्ट्रिकवर चालणारी वाहने आर्थिकदृष्ट्या परवडणारी ठरत आहेत.

राज्यात डिसेंबर 2020मध्ये 610 सीएनजी वाहनांची विक्री झाली.
जानेवारीत ही संख्या 810, तर फेब्रुवारीत 2 हजार 288 वर पोहोचली.
पेट्रोल आणि सीएनजीवर चालणा-या 6 हजार 415 वाहनांची डिसेंबरमध्ये विक्री झाली होती.
जानेवारीत ही संख्या 8 हजार 885, तर फेब्रुवारीत 7 हजार 492 वर पोहोचली.

कोरोनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करणं अनेकजण टाळतायत... स्वतःचं वाहन घेण्याकडेही अनेकांचा कल आहे. त्यामुळं सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांचा भाव वाढलाय.