मोठी बातमी । शिवसंपर्क अभियानातच शिवसेनेतील बंडाचे संकेत
Maharashtra political crisis : शिवसंपर्क अभियानातच बंडाचे संकेत मिळाल्याची माहिती समोर येतेय. फेब्रुवारीतील विधिमंडळ अधिवेशनात शिवसेना आणि सहयोगी आमदारांच्या नाराजीचा कडेलोट झाला होता.
मुंबई : Maharashtra political crisis : शिवसंपर्क अभियानातच बंडाचे संकेत मिळाल्याची माहिती समोर येतेय. फेब्रुवारीतील विधिमंडळ अधिवेशनात शिवसेना आणि सहयोगी आमदारांच्या नाराजीचा कडेलोट झाला होता. महाविकास आघाडीविरोधात आणि त्यातही राष्ट्रवादीच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त झाल्याने शिवसेनेतील बंडाचे संकेत मिळाले होते. याच नाराजीचा स्फोट राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीनंतर आता नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीतून झाला आहे, अशी माहिती समोर येतेय.
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात या शिवसंपर्क अभियानाच्या बैठकांवेळी शिवसेना आमदारांच्या नाराजीचा भडका उडाला. नेत्यांसमोर नाराजीचा पाढा वाचून शिवसेनेचे आमदार व पदाधिकारी थांबले नाहीत तर महाविकास आघाडी पक्षाच्या मुळावर येत असल्याचा इशाराही काही जणांनी दिला. शिवसेनेत आतल्या आत मोठ्या प्रमाणात खदखद असून त्याचा कधीही स्फोट होईल असे संकेत त्या अभियानात मिळाले होते. महाविकास आघाडीऐवजी भाजपबरोबर युती करावी, अशी शिवसेनेतील बहुसंख्य आमदारांची भूमिका आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना बंडाचा आज नवा अध्याय सुरु झाला आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना रात्रीत गुजरातहून गुवाहाटीला नेण्यात आलंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातल्या भूकंपाचं केंद्र आता गुजरातमधून आसामच्या गुवाहाटीत गेलंय. शिवसेनेच्या गुजरातमधून आमदारांना रात्री तीन वाजता सूरतहून गुवाहाटीकडे नेण्यात आलंय. शिवसेना आमदारांसाठी २ चार्टर्ड प्लेन तैनात केली होती. एकनाथ शिंदे यांच्यासह सूरतहून आता शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीत दाखल झालेत. आपल्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार सोबत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडूही एकनाथ शिंदे यांच्यासह आहेत. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईही एकनाथ शिंदे यांच्यासह दाखल झाले आहेत.
आणखी 10 आमदार येणार असल्याचा शिंदे यांनी दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांचा 40 आमदार सोबत असल्याचा दावा आहे. असं झाल्यास एकनाथ शिंदेंच्या गटात 50 आमदार असतील. एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट सध्या आसाममध्ये दाखल झाला आहे. एकनाथ शिंदे वेगळा गट स्थापन करणार आहेत. तसे ते आज राज्यपाल यांना पत्र देणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.