राणेंना जोरदार धक्का, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची कार्यकारणी बरखास्त
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना काँग्रेसने जोरदार दणका दिलाय. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारणी पक्षाने बरखास्त केली आहे
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना काँग्रेसने जोरदार दणका दिलाय. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारणी पक्षाने बरखास्त केली आहे. त्यामुळे आता काँग्रेस अंतर्गत वाद उफाळणार आहे. राणे आता काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, विकास सावंत यांची नुतन जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेय.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आज सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष आणि कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत.
पक्षाचे नुतन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हा काँग्रेस कार्यकारणी, ब्लॉक अध्यक्ष आणि ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. नुतन जिल्हाध्यक्ष विकास सावंत हे राज्याचे माजी मंत्री भालचंद्र तथा भाई सावंत यांचे चिरंजीव आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून पक्षसंघटनेचे काम पाहत आहेत.
काँग्रेसने राणे यांना जोरदार दे धक्का दिल्याने राणे अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे जुने निष्ठावंत आणि नवीन असा वाद आता उफाळणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तविण्यात आलेय.