Video: पिल्लाला वाचवण्यासाठी आईची धडपड, मालवणच्या समुद्रात घडलेला हृदयद्रावक प्रसंग
Malvan Dolphine News: मालवण तालुक्यातील तळाशील कवडा रॉक नजीकच्या समुद्रात मोठा डॉल्फिन एका मृत झालेल्या डॉल्फिनच्या पिल्लाला पाण्याबाहेर आणून पुन्हा पाण्यात घेऊन जात आहेत.
Malvan Dolphine News: मालवणच्या समुद्रात एक हृदयद्रावक प्रसंग घडला आहे. मालवण तालुक्यातील तळाशील कवडा रॉकनजीकच्या समुद्रात मोठा डॉल्फिन एका मृत झालेल्या डॉल्फिनच्या पिल्लाला पाण्याबाहेर आणून पुन्हा पाण्यात घेऊन जात त्याचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न करत होता. आपल्या परिवारातील एक सदस्य जखमी होऊन मृत झाल्यानंतर हंपबॅक डॉल्फिन भावनाविवश होत त्याची काळजी घेत आहे. हा व्हिडिओ अनेकांना भावूक करुन जातोय.
मालवण तालुक्यातील तळाशील कवडा रॉक नजीकच्या समुद्रात हा प्रसंग घडला आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, एक पौढ डॉल्फिन एका डॉल्फिनच्या मृत पिल्लाला पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन आपल्या तोंडाच्या सहाय्याने ढकलताना दिसत आहे. सुरुवातीला डॉल्फिन एकमेकांवर हल्ला करत आहेत, असं वाटत होतं. मात्र जवळ जावून पाहिल्यावर त्यातील एक डॉल्फिन मृत झाल्याचे लक्षात आहे. पिल्लू पुन्हा जिवंत होईल या आशेने त्याला जिवंत करण्यासाठी डॉल्फिन त्याला पाण्यात वर खाली करत असल्याचे दिसून आले.
थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन करण्यासाठी पर्यटक तळाशील कवडा रॉक नजीकच्या समुद्रात समुद्र सफारी करत असताना हे दृश्य त्यांनी आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केले. माणूस जसा आपल्या जवळच्या व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी जीवाच रान करत असतो. हा गुण जसा मानवामध्ये आढळून येतो तसाच तो प्रत्येक प्राणीमात्रातही दिसून येतो याचीच प्रचिती यामधून येते. या प्रकारातून डॉल्फिन माशांमध्ये एकमेकाप्रती असलेले प्रेम दिसून आले आहे. पर्यटकांनी कॅमेरात कैद केलेला हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
डॉल्फिन हा सस्तन प्राणी आहे. तसंच, या व्हिडिओत असलेले डॉल्फिन हे आई आणि तिचे पिल्लू असल्याचे बोललं जातं आहे. तसंच, डॉस्फिन हे कळपात राहणारे प्राणी आहेत. या कळपातील एखाद्याला इजा झाली तर ते त्याची काळजी घेतात. पिल्लांच्या बाबतीत तर त्यांचे अधिक लक्ष असते. या घटनेत मृत डॉल्फिनचे पिल्लू मृत झाले तेव्हा कोणाच्या लक्षात आले नसेल किंवा त्यांना अतिदुखः झाले असेल. त्यामुळं त्यांना या मृत पिल्लाला सोडून जाता येत नव्हते. म्हणून ते मृत पिल्लाला जिवंत ठेवण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर ढकलत होते. कारण डॉल्फिनला श्वास घेण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर यावे लागते, अशी माहिती डॉल्फिन संशोधक मिहीर सुळे यांनी एका वृत्तापत्राला दिली आहे.