मालवणच्या किनाऱ्यावर पर्यटकांचा अतिउत्साह, जीवघेण्या सेल्फीचा व्हिडिओ
मालवणात सध्या दमदार पाऊस पडत आहे. समुद्रही खवळला आहे. जोरदार लाटा किनारपट्टीवर धडकत आहेत.
मालवण : मालवणात सध्या दमदार पाऊस पडत आहे. समुद्रही खवळला आहे. जोरदार लाटा किनारपट्टीवर धडकत आहेत. मालवण रॉक गार्डन परिसरात या लाटा अधिकच उसळत आहेत. अनेक पर्यटक आणि नागरिक या लाटांचा आनंद लुटतायेत. त्यात काही अतिउत्साही पर्यटकही असतात. रॉक गार्डन पार्कींग ठिकाणी कार पार्क करून काही युवक पोलीस वसाहती मागील खडकाळ परिसरात उसळणाऱ्या लाटांचा आनंद लुटत होते. दगडांवर बसून सेल्फीही घेत होते. हे दृश्य रॉक गार्डन व्यवस्थापक उमेश हर्डीकर यांनी पाहिले. त्या पर्यटकांना ओरडून सूचना केल्या. तर काहींनी पर्यटकांचा हा अतिउत्साहीपणा मोबाईल कॅमेरात कैद केला.
याचवेळी उसळलेली मोठी लाट पर्यटकांच्या अंगावर धडकली. यात हे पर्यटक दगडात फेकले गेले. त्याच वेळी शूटिंग करणारे पण त्या पर्यटकांना वाचवण्यासाठी धावले. मात्र सुदैवाने पर्यटक बचावले पण काही प्रमाणात किरकोळ जखमी झाले. या घटनेनंतर लागलीच पर्यटकांनी तेथून काढता पाय घेतला. रत्नागिरीतील समुद्रकिना-यावर पोहताना नुकताच मुंबईतील एका कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला होता. वारंवार आवाहन करुनही पर्यटक समुद्राजवळ जाण्याचा प्रयत्न करतातय. पर्यटकांनो समुद्रात जाण्याचा मोह टाळा आणि सेल्फी काढण्याचाही हट्ट धरु नका.