दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांचे नाव मागे पडल्यानंतर आता आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी मावळमधून निवडणूक लढवण्याचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मावळमध्ये तगडा उमेदवार दिला तर ही जागा जिंकली जाऊ शकते असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. त्यामुळेच आधी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव समोर आले होते. पार्थ पवार यांनी या मतदारसंघात कामही सुरू केले होते. मात्र एकाच घरातील तीन उमेदवार रिंगणात नको म्हणून शरद पवारांनी पार्थ पवार यांच्या नावावर फूली मारली.


शरद पवारांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीला नकार दिल्यानंतर स्मिता पाटील यांचे नाव पक्षाने मावळसाठी पुढे आणले आहे. याबाबत स्मिता पाटील यांच्याशी पक्षाच्या नेत्यांची प्राथमिक बोलणी झाली आहे. फक्त स्मिता पाटील यांच्याकडून होकार येण्याची पक्ष वाट बघतोय.


मावळ मतदारसंघात येणाऱ्या पनवेल आणि त्या लगतच्या परिसरात आर. आर. पाटील यांच्याबद्दल डान्स बार बंदीच्या निर्णयामुळे प्रचंड सहानुभूती आहे. राज्यात या भागात सर्वात जास्त डान्सबार होते. ते बंद झाल्यानं तरुण पिढी उद्धवस्त होण्यापासून वाचली आहे. डान्सबार बंदीच्या निर्णयाचा पुढे स्मिता पाटील यांनीही पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यामुळे त्यांच्याबद्दलही या भागात सहानभूती आहे. त्याचबरोबर मावळ, पिंपरी चिंचवड या भागातही आर. आर. पाटील यांच्यामुळे स्मिता यांच्याबद्दल सहानुभूती असून त्याचा फायदा या मतदारसंघात होऊ शकतो असा पक्षाला अंदाज आहे.


पाहा बातमीचा व्हिडिओ