#युतीरिटर्न्स : शिवसेना- भाजप युतीनंतर सोशल मीडियावर `हे` मीम्स व्हायरल
पाहा युतीविषयी नेटकरी काय म्हणतात...
मुंबई : सोमवारी शिवसेना आणि भाजप युतीची अधिकृत घोषणा आली आणि राजकीय वर्तुळात सुरू असणाऱ्या सर्व चर्चा शमल्या. अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेत याविषयीची घोषणा केली. लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागांवर ही युती झाली. २५ वर्षांपासूचनच्या युतीचा उल्लेख करत देश आणि राज्य अशा दोन्हीकडच्या राजकीय पटलावर शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकत्र वावरल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. इथे हे दोन मोठे पक्ष एकत्र आल्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र स्वाभिमान आणि स्वत:च्या बळावर निवडणूक लढवण्याच्या घोषणा देणाऱ्या शिवसेनेच्या युतीच्या भूमिकेची खिल्ली उडवली आहे.
#शिवसेनेचायुटर्न #युती #युतीरिटर्न्स हे असे हॅशटॅग सध्या ट्रेंडमध्ये असून, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, शिवसेना या विषयांची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगत आहे. चित्रपटांच्या विविध दृश्यांचा वापर करत त्याचा संदर्भ शिवसेनेच्या भूमिकेशी जोडत नेटकऱ्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील या महत्त्वाच्या पक्षाची खिल्ली उडवली आहे. पुन्हा युती नाही अशी उद्धव ठाकरेंनी केलेली घोषणाही यावेळी त्यांना आठवणीत आणून देण्यात आली.
कार्यकर्त्यांची या युतीमुळे नेमकी काय परिस्थिती झाली असेल, याविषयीच्या मीम्सपासून युतीला विविध दृष्टीकोनातून मांडत हे ट्विट करण्यात आले आहेत. त्यामुळे ही राजकीय गणितं जनतेला मात्र काहीशी पटलेली नाही, हेच आता स्पष्ट होत आहे. आता युतीचा फायदा कोणाला होणार आणि शिवसेनेच्या वाट्याला नेमकं काय येणार हे येणारा काळच ठरवणार आहे.