मुंबई : राज्यातील गृहनिर्माण संस्थांची ( Housing Society) संख्या विचारात घेता प्रत्यक्षात गृहनिर्माण  संस्थेचे मानीव अभिहस्तांतरण झालेल्या संस्थांची संख्या अल्प आहे. मानीव अभिहस्तांतरण प्रक्रियेची (Deemed Conveyance of a Co-operative Housing Society) माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि ही प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून संस्थांसाठी १ ते १५ जानेवारी २०२१ पर्यंत मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स) ((Deemed Conveyance) विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. तसेच यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुरतता करावी लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मोहिमेद्वारे सहकारी गृहनिर्माण संस्थांना मानीव अभिहस्तांतरणाबाबतची माहिती देण्यात येणार आहे. गृहनिर्माण संस्था ज्या जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था तथा सक्षम प्राधिकारी यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे. त्या कार्यालयाकडे संस्थेने मानीव अभिहस्तांतरणाबाबतचा अर्ज विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा, असे बाळासाहेब पाटील म्हणाले.


यामुळे राज्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या जमिनीचे कायदेशीर हक्क, विकासकाकडून प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आहे. इमारत संस्थेची मालकीदेखील संस्थेचीच, यानुसार आपण या विशेष मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन सहकारमंत्री पाटील यांनी केले आहे.


आवश्यक कागदपत्र :


मानीव अभिहस्तांतरणाकरिता नमुना ७ मधील अर्ज
सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी प्रमाणपत्र/कंपनी नोंदणी प्रमाणपत्र, Deed of Declaration ची प्रत.
संस्थेच्या, कंपनीच्या साधारण सभेतील मानीव अभिहस्तांतरण करण्याबाबत केलेल्या ठरावाची प्रमाणित प्रत.
मिळकत पत्रिकांचा तीन महिन्याच्या आतील उतारा (मालमत्ता पत्रक, ७/१२ उतारा इ.)
संस्थेतील सर्व कायदेशीर सदनिकाधारकांची,संचालकाची विहित नमुन्यातील यादी.
सहकारी गृहनिर्माण संस्थेने, कंपनीने अभिहस्तांतरण करुन देण्यासाठी अधिनियम १९७० अन्वये प्रवर्तकाला बजावलेली कायदेशीर नोटीस, पत्रव्यवहाराचा तपशील व घटनाक्रम.
नियोजन, सक्षम प्राधिकरणाने दिलेले बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र तसेच भोगवटा प्रमाणपत्र.



संबंधित संस्थेकडे,कंपनीकडे भोगवटा प्रमाणपत्र नसल्यास इमारतीचा प्रत्यक्ष ताबा घेण्यात आल्याचे तसेच इमारतीच्या संदर्भात असलेल्या सर्व जबाबदाऱ्या,दायित्वे स्विकारण्यास तयार असल्याचे तसेच मानीव अभिहस्तांतरण झाल्यानंतर संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज करणार असल्याबाबत स्व-प्रमाणपत्र.
तसेच मानीव अभिहस्तांतरण संबंधातील शासन निर्णय व परिपत्रके आणि इतर माहिती http://housing.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.