चारित्र्याच्या संशयावरुन पतीने क्रुरतेचा कळस गाठला, पत्नीला आता आरशासमोर जायलाही वाटते भीती
सोलापूर जिल्ह्यात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली असून नराधम पतीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याप्रकरणी पोलीस शोध घेत असून आरोपी फरार आहे.
अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर : पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरुन (Doubts on Wife Character) एका पतीने क्रुरतेचा कळस गाठला. नराधम पतीने पत्नीबरोबर केलेल्या कृत्याने सोलापूर (Solapur) जिल्हा हादरला आहे. याप्रकरणी पोलिसांत (Solapur Police) तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी पती फरार आहे. पोलिसांनी पथकं तैनात केली असून त्याचा शोध घेतला जात आहे. सोलापूरमधल्या नविन विडी परिसरात ही घटना घडली आहे.
काय आहे नेमकी घटना?
पहिल्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर पीडित महिलेची 2015 मध्ये अकिल सय्यद नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. अकिल हा विवाहित होता, पण त्याने पीडित महिलेपासून ही गोष्ट लपवून ठेवली. त्यानंतर 2019 मध्ये आरोपी अकिलने पीडित महिलेशी लग्न केलं. पीडित महिलेला पहिल्या पतीपासून तीन मुलं आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पीडित महिला नोकरीच्या शोधाक पुण्यात गेली. पण काही दिवस पुण्यात राहिल्यानंतर ती पुन्हा सोलापूरला आपल्या घरी परतली.
पण पुण्याहून परतल्यापासून अकिल तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. तिला मारहाण करणं, शिविगाळ करणं हे प्रकार दररोजचे होऊ लागले. पण घटनेच्या दिवशी आरोपी अकिलने क्रुरतेचा कळस गाठला. त्याने पीडित महिलेला मारहाण करत चाकूने तिचा कानच कापून टाकला. यानंतर तो फरार झाला. गंभीर जखमी झालेल्या महिलेला तिचाई आणि इतर नातेवाईकांनी तात्काळ छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालायत दाखल केलं. डॉक्टरांनी घटनेची दखल घेत तातडीने उपचार करत तिच्या कानावर शस्त्रक्रिया केली.
याप्रकरणी आरोपी अकिल सय्यदविरोधात सोलापूरमधल्या वळसंग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
बुलडाण्यात शिक्षकाकडून अत्याचार
बुलढाणा तालुक्यातील कोलवड इथल्या मिलिटरी स्कूल (Military School) मध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मिलिटरी स्कूलमधल्या 10 वीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यावर तिथल्या शिक्षकाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात पोस्कोअंतर्गत (Posco) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षकाचं नाव धर्मेंद्र हिवाळे असं असून अविवाहि आहे. प्रात्यक्षिक परीक्षेत नापास करु, जिवे मारू अशा धमकी देत त्याने दोन विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत बोलावलं.
त्यानंतर त्याने दोन्ही विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार केला. सतत चार दिवस असे प्रकार सुरु होते. अखेर त्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यानंतर प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत शाळेनेच आरोपी शिक्षकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.