Solapur LokSabha Constituency : भाजपने लोकसभेची पाचवी यादी जाहीर केली अन् पुन्हा धक्कांतत्रांचा अवलंब केला. देवेंद्र फडणवीसांचे मर्जीतील नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राम सातपुते यांना सोलापूरच्या जागेवर तिकीट देण्यात आलं. त्यामुळे आता सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यात लढत (Ram Satpute Vs Praniti Shinde) पहायला मिळणार आहे. अशातच आता दोन्ही उमेदवारांमध्ये वेलकम वॉर सुरू झालं आहे. राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रणिती शिंदे यांच्या या पत्रातून त्यांनी नकळतपणे राम सातपुते हे बाहेरचे उमेदवार आहेत हे ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. इथला असो किंवा बाहेरचा, असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. तर राम सातपुते यांनी देखील प्रणिती शिंदेंना धन्यवाद पत्र लिहित सोलापूरच्या जनतेने चांगलंच ओळखलंय, असं म्हणत प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे आता सोलापूरची लढाई ही चांगलीच गाजणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रणिती शिंदे म्हणतात...


राम सातपुते आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणुक रिंगणात स्वागत आहे. सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे, इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा... मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते. तसंच या उमेदवारीच्या निमित्ताने तुम्हाला जी संधी मिळालीये त्या बद्दल शुभेच्छा देते. लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्व असावं असं माझं मत आहे. पुढील ४० दिवस याचं भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू, अशी मी आशा करते. सोलापूरकरांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं सोलापूरात स्वागत करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या होत्या. त्यावर राम सातपुते यांनी पत्र लिहित प्रत्युत्तर दिलं.


काय म्हणाले राम सातपुते?


मी 2019 पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय. मी आमदार झाल्यापासून ते आजतोवर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या, आणि त्यायोगे सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीने प्रामाणिकपणे होईल तेवढी विकासकामे करण्याचा प्रयत्न केलाय. मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, तिथे आम्ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास" या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत. समाजात धर्म, जातीपातीत फूट पाडून कुणी एवढं वर्ष राजकारण केलंय, हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेनं आता चांगलंच ओळखलंय. राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका ऊसतोड कामगाराच्या कुटूंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवलाय, त्याला सोलापूरचा सर्वांगिण विकास करून सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन, असं म्हणत राम सातपुते यांनी प्रणिती शिंदे यांना उत्तर दिलंय.


दरम्यान, भाजपच्या पाचव्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतला लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कंगना मंडीमधून निवडणूक लढवेल. तर बेगुसरायमधून गिरिराज सिंग यांची उमेदवारी निश्चित झालीये. तसेच पटना साहिबमधून रवी शंकर प्रसाद लढतील. त्याचबरोबर सुल्तानपूरमधून मेनका गांधी यांना तिकीट देण्यात आलं आहे. भाजपने पाचव्या यादीत एकूण 111 उमेदवारांची नावं निश्चित केली.