COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : कोरोनाने जगासह देशभरात थैमान घातले आहे. केंद्र आणि राज्य सरकार याविरोधात एकत्र येऊन लढा देत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या सर्वात सफाई कामगार, पोलीस, आरोग्य कर्मचारी मोठी कामगिरी बजावत आहेत. सीमेवरचा सैनिक जसे आपले रक्षण करतात त्याप्रमाणे कोरोना विरोधातील या लढाईत हे कर्मचारी आपल्यासाठी घराबाहेर पडले आहेत. या सर्वांचे प्रयत्न, उपाययोजनांमुळे आपण कोरोनाला आटोक्यात आणत आहोत. 


पोलीस, प्रशासन यांनी वारंवार आवाहन करुनही अनेकजण संचारबंदीचे उल्लंघन करत आहेत. या वास्तवावर आपल्या डोळ्यात अंजन घालणारी आणि काळजाचा ठोका चुकवणारी एक कविता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहरातील पोलीस कर्मचाऱ्याने ही कविता म्हटली आहे. 


बाबा, काय चुक होती माझी ? असे या कवितेचे शिर्षक आहे. कोरोनाचे संकट डोक्यावर असताना देखील काही ना काही कारणं सांगून घराबाहेर पडणाऱ्या बाबाला त्याचे बाळ हा प्रश्न विचारतंय. आज्जीने सांगूनही बाजारहट करण्याच्या नावे तुम्ही घराबाहेर गेलात आणि कोरोनाचा आजार घरात आणलात. यामध्ये माझी काय चुक होती ? असा केविलवाणा प्रश्न ते बाळ विचारत असल्याचा भावार्थ या कवितेचा आहे. 


पोलीस दांडग्याने मारतात म्हणून त्यांचा राग करणाऱ्यांनी पोलिसांची ही हळवी बाजू नक्की पाहायला हवी. ही कविता ऐकून कोणता बाबा..विनाकारण घराबाहेर पडणार नाही एवढं मात्र नक्की !