Solapur Crime News: नात्याला काळिमा फासणारी घटना सोलापुरात घडली आहे. पोटच्या लेकाचीच वडिलांनी हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. स्वतःच्याच मुलाला कोल्डड्रिंकमधून विषारी पावडर टाकून त्याला प्यायला दिले. या कोल्डड्रिंकमुळं चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विजय बट्टू असं वडिलांचे तर विशाल बट्टू असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात विजय ह्याला अटक करत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुर्देवी मुलाचे वय अवघे 14 वर्षे आहे. इतक्या लहान वयाच्या मुलाचा जीव जन्मदात्या पित्यानेच का घेतला असावा असा प्रश्न परिसरातून उपस्थित केला जात आहे. इतकेच नव्हे तर, आरोपी विजय ह्याने त्याच्या पत्नीजवळ मुलाचा खून केल्याची कबुली दिली होती. मुलाच्या मृत्यूनंतर 15 दिवसांनी त्यांनी कबुली दिली होती. यानंतर आईनेच पोलिसांत तक्रार देत या घटनेचा खुलासा केला. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा शाळेत खूप मस्ती करायचा त्यामुळं सतत तक्रारी यायच्या. खोडकरपणा, अभ्यास न करणे, सतत मोबाइल फोन पाहणे, या कारणांमुळं संतापलेल्या वडिलांनीच हे टोकाचे पाऊल उचलले आहे. एरव्ही शांत स्वभाव असलेल्या पित्याने इतके कठोर पाऊल उचलल्याने नातेवाईकांसह शेजाऱ्यांनाही जबर धक्का बसला आहे. 


शहरातील तुळजापूर रस्त्यावर सर्व्हिस रोडवर नाल्यालगत असलेल्या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा विशाल हा 13 जानेवारीपासून घरातून बेपत्ता होता. त्यानंतर रात्री नाल्यालगत असलेल्या रोडवर तो मृतावस्थेत सापडला होता. तेव्हा पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली होती. 


मुलाच्या मृत्यूचे शवविच्छेदन केल्यानंतर विशालच्या शरीरात सोडियम नायट्रेट नावाचे विष आढळून आले. त्यामुळं हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी त्यासंदर्भात त्यांच्या शेजारी व परिसरात चौकशी केली. पण काहीच माहिती सापडली नाही. मात्र पोलिसांना विशालचे वडिल विजय यांच्या जबाबत विसंगती आढळून आले. त्यामुळं त्यांनी अधिक खोलात जाऊन चौकशी सुरुच ठेवली. 


विशाल बट्टू या नववीत शिक्षण घेत होता. मुलाच्या मृत्यूनंतर त्याची आई किर्ती ही मानसिक धक्क्यात होती. घरातील वातावरणही शांत होते. मुलाच्या हत्येचा पश्चात्ताप विजयला झाल्यानंतर त्याने 28 जानेवारी रोजी आपल्या पत्नीसमोर विशालची हत्या केल्याचा कबुलीजबाब दिला. त्यानंतर संतापलेल्या माऊलीने इतर नातेवाईकांना हाताशी धरुन विजयविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 


विजय आणि विशाल 13 जानेवारी रोजी दुचाकीवर बसून तुळजापूर रस्त्यावर गेले. तिथे विजयने एका कॉल्डड्रिंक्सच्या बॉटलमध्ये सोडियम नायट्रेट ही विषारी पावडर मिसळून त्याला पाजले. त्यामुळं विशाल तिथेच बेशुद्ध पडला आणि गतप्राण झाला. हे कृत्य करुन विजय अत्यंत थंड डोक्याने घरी परतला. पोटच्याच मुलाला ठार केल्यानंतर काहीच घडले नाही अशा अर्विभात विजय वावरत होता. विशालच्या शाळेतील खोड्याने व उद्धट बोलण्याच्या स्वभावाने त्रासल्यामुळं विजयने हे कृत्य केल्याचे त्याने कबुल केले आहे.