नाशिक : नाशिक शहरात होणारे 94 वे साहित्य संमेलन सुरू होण्याआधीच नियोजित खर्च आणि देणग्यांच्या संकलनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सुरुवातीला साहित्य संमेलनास सव्वा ते दीड कोटी रुपयांच्या दरम्यान खर्च येणे अपेक्षित असल्याचं साहित्य महामंडळाला कळवण्यात आले होते. मात्र त्यानंतर अचानक त्यात वाढ होऊन हे बजेट चार पाच कोटींवर गेले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या खर्चसाठी राज्य सरकारच्या निधीतून आणि दानशूर यांच्या देणगीचा निधी एका ठिकाणी संकलित करण्यासाठी साहित्य महामंडळाच्या नावाने एकच बँक खाते उघडणे आवश्यक असते . मात्र साहित्य महामंडळाच्या सूचना डावलून निमंत्रकानी  '94 वे साहित्य संमेलन लोकहितवादी मंडळ'च्या नावाने दोन बँकांमध्ये खाते उघडले. त्यामुळे यातील नियोजित आर्थिक  घोटाळ्याचे संशयाचे ढग अधिकच गहिरे झालेत.


महामंडळाचे निर्देश डावलून असे बँक खाते उघडण्याची घटना घडल्यानं महामंडळातील सदस्यानी तीव्र आक्षेप घेतला आहे. पालकमंत्र्यांना म्हणजेच स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनाही याबाबत तक्रार करन्यात आली.  प्रकरण अधिक अंगाशी येऊ नये म्हणून आता लोकहितवादी नाव वगळत '94 वे साहित्य संमेलन नाशिक'  अशा नावाने नाशिक मर्चंट आणि विश्वास बॅँकेत दुरुस्ती करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे बँक खाते क्रमांक ही तोच कायम ठेवण्यात आला आहे.  यामुळे साहित्याच्या आड शिजतेय काय? असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.