निलेश महाजन, झी मीडिया, जालना: आपल्याकडे काहीजण गरिबांना वाटण्यात येणाऱ्या अन्न वाटपातही भ्रष्टाचार करतात, अशी खंत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली. ते बुधवारी जालन्यात अन्नामृत फाउंडेशनच्या मध्यान्ह भोजन योजनेच्या स्वयंपाक गृहाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अन्न वाटपात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर ताशेरे ओढले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनुष्य आणि प्राणी स्वतःच्या जगण्याची व्यवस्था कशीही करतो. मात्र, जो दुसऱ्यासाठी चांगले काम करतो, तो स्वर्गात देव बनतो. आतापर्यंत मी देशातील बऱ्याच राज्यात फिरलो आहे. त्यावेळी मध्यान्ह भोजन योजनेच्या अनेक तक्रारी आपल्या कानावर पडल्या. गरिबांसाठी जाणारे अन्नही काही जण मध्येच खाऊन टाकतात. अनेक राज्यात मध्यान्ह भोजन योजनेत घोटाळे करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे यावेळी भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले. 


तत्पूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मंगळवारी नवी मुंबईतील कार्यक्रमात शिवथाळी योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान आलेला एक अनुभव सांगितला होता. आमच्या सरकारने १० रुपयांत थाळी सुरु केली. ही थाळी लोकांच्या पसंतीस उतरत आहे. मात्र, काही ठिकाणी मी बघतो की, ज्यांची ऐपत आहे,तो पण थाळीवर ताव मारतो. बाबा असं करू नका, आधी ज्याच्या खिशात पैसै नाही, त्यांना थाळी मिळू द्या. हा सल्ला मी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना देत असल्याचे अजितदादांनी यावेळी सांगितले होते.