लातूर : पोटच्या मुलाने आपल्या आई-वडिलांनाच नारळ पाण्यातून विष पाजल्याचा धक्कादायक प्रकार लातूरमध्ये उघड झालाय. घर नावावर केल नाही म्हणून  मुलाने टोकाचे पाऊल उचलले. विष मिसळून  नारळ पाणी आई- वडिलांना दिल्याने ते त्यांनी प्राशन केले. त्यानंतर वडील साधुराम कोटंबे यांचा मृत्यू झाला आहे तर आई गयाबाई कोटंबे या बचावल्या असून त्यांच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नात्याला काळिमा फासणारी ही घटना शहरातील मोरेनगर भागात घडली आहे. दरम्यान, मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


एम.एस्सी. पर्यंत उच्चशिक्षण घेतलेल्या मुलाने ज्ञानदीप कोटंबे याने प्रॉपर्टीच्या वादातून हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. गेल्या महिन्यातच आई-वडिलांनी मोठ्या दिमाखात ज्ञानदीपचा विवाह लातूर तालुक्यातील निवळी येथे लावून दिला होता. औरंगाबादकडे मोठ्या मुलाकडे राहत असलेल्या आई-वडिलांना ज्ञानदीपने आपला संसार पाहायला या म्हणून बोलावून घेतले होते. शहरातील मोरेनगर भागातील घर नावावर करुन देण्यासाठी आरोपी आपले ६५ वर्षीय वडील साधुराम कोटंबे यांच्याकडे तगादा लावून होता. मात्र वडील याबाबत उशीर करीत असल्यामुळे ज्ञानदीपने आपल्या आई-वडिलांना मारण्याचा कट रचला. 



आपल्या पत्नीसोबत आई-वडील बाहेर गेल्यानंतर आरोपी ज्ञानदीपने नारळ पाणी आणून त्यात विष मिसळले आणि आई-वडील बाहेरुन येताच त्यांनी ते नारळ पाणी पिण्यासाठी दिले. मात्र नारळ पाणी पिताना यात काही तरी मिसळले असल्याचा आईला संशय आला. आईने ते पाणी प्यायले नाही. मात्र, वडिलांनी ते पाणी संपविले होते. विष मिश्रीत पाणी प्यायल्याने वडिलांचा मृत्यू झाला मात्र, आई गयाबाई कोटंबे या बचावल्या. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी आरोपी ज्ञानदीप कोटंबे याला अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.