COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लातूर : पत्नीच्या बाळंतपणासाठी सासरी आलेल्या जावयाने किरकोळ भांडणातून सासऱ्याच्याच नाकाचा चावा घेत लचका तोडलाय. लातूर जिल्ह्यातील औसा इथं हा धक्कादायक प्रकार घडलाय. संतोष यादव असे या जावयाचे नाव असून तो मूळचा उस्मानाबादजिल्ह्यातील शिराढोण इथला रहिवासी आहे. नुकताच अधिकमास अर्थात धोंड्याचा महिना संपला. धोंड्याच्या महिन्यात जावयाचा मोठा मान-सन्मान सासरची मंडळी करीत असतात. मात्र हा धोंड्याचा महिना संपतो न संपतो तोच औसामध्ये ही धक्कादायक घटना घडलीय.


नुकताच धोंडे जेवणाचा पाहुणचार घेऊन गेलेला संतोष यादव आपली पत्नी रेखा बाळंतीण झाल्यामुळे बाळ पाहण्यासाठी आला होता. मात्र काही वादामुळे तो पत्नीला मारहाण करू लागला. त्यामुळे सासरे नागनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली. मात्र सासऱ्यानी मध्यस्थी केल्याचे पाहताच जावई संतोष यादवने चक्क सासरे नागनाथ शिंदे यांच्या नाकाच्या शेंड्याचा चावा घेत लचका तोडलाय. यानंतर सासरच्या मंडळींनी संतोष यादवची धुलाई केली. या प्रकरणी जावयावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. रामायणात लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापल्याचे साऱ्यांनीच ऐकलंय. मात्र २१ व्या शतकातील संतोष यादव या बहाद्दर जावयाने चावा घेऊन सासऱ्याच्या नाकाचा लचका तोडल्यानं त्याची पंचक्रोशीत जोरदार चर्चा सुरु आहे.