चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ : नुसतं सोनचाफा म्हटलं तरी प्रेमाच्या संवेदना उमटल्याशिवाय राहत नाही. ज्याला त्या संवेदना उमटणार नाही तो माणूसच भावनाहीनच. याच भावनेनं मावळ तालुक्यातील इंदोरी गावातील प्रगतशील शेतकरी अरुण काशीद यांनी भंडारा डोंगराच्या पायथ्याशी सोनचाफ्यांची बाग फुलवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरुण काशीद यांनी ही बाग नुसतीच फुलवलीच नाही तर त्यातून भरघोस उत्पन्नही घेत आहेत. सोनचाफ्याची ही बाग म्हणून फुलविणारे अरुण काशीद हे मावळ तालुक्यात वेगळेच शेतकरी ठरले आहेत. या चाफ्याच्या शेतीमागची यशोगाथा काय आहे हे पाहू...


आधुनिकतेची कास धरत काशीद यांनी काळ्या आईची सेवा करण्याची परंपरा सोडली नाही. देवाला वाहण्याचे फूल आपल्या शेतीतून जावे या तळमळीने त्यांनी घेतलेले कष्ट यशस्वी ठरले. दररोज दीड ते दोन हजार फुले बागेत बहरत आहेत. त्यातून मिळणाऱ्या पैशापेक्षा त्यांना आत्मिक समाधान अधिक मोलाचे वाटते.


अरुण काशिद हे प्रगतशील शेतकरी आहेत. काशीद यांना सोनचाफा फुलांची शाळेत असल्यापासूनच आवड होती. काशीद यांनी शेतात उस, भात, सोयाबीन, कडधान्य, वांगी, मिरचीसारखी भाजीपाला लावला. सॊबतच एक वेगळा प्रयोग म्हणून त्यांनी सोनचाफ्याची बाग फुलवली.


काशीद यांनी आपल्या शेतातील वीस गुंठे जागेत सुमारे 200 झाडे लावली. झाडांची काळजी घेताना त्याला फक्त शेणखत आणि स्लरी वापरली जाते. त्यांच्या या शेतीमुळे अवघा परिसर सोन चाफ्यांच्या सुगंधाने दरवळून जातो.


शेतात फुलांची संख्या वाढत होती. याच काळात कोरोना महामारीने जग थांबले. झाडाला फुले यायला सुरुवात आणि कोरोनामुळे सर्व काही बंद होण्यास एकच वेळ झाली. त्यानंतर सलग सात महिने फुलांनी भरलेली झाडे चांगली वाटत होती. मात्र, त्याचा काहीच उपयोग होत नसल्याने त्यांना वाईटही वाटत होते. पण काहीच पर्याय नव्हता.


आताच्या काळात सध्या दररोज दोन हजार फुले येतात. कमीत कमी एक रुपया तर जास्तीत जास्त दोन रुपये भावाने सध्या फुलांची विक्री होते. तळेगाव, पिंपरी-चिंचवड, पुणे येथील बाजारपेठेत फुले विक्रीसाठी जातात. आवड म्हणून केलेली सोनचाफ्यांची बाग सध्या उत्पन्न मिळवून द्यायला लागली आहे.



आपल्या बागेची माहिती देताना केतकी काशीद म्हणतात, दररोज सकाळी सहा वाजता ही फुले तोडावी लागतात. घरातले सर्वजण फुले या कामात मदत करतात. तोडलेल्या फुलांची पॅकिंग करण्यात तब्बल तीन तास जातात. त्यानंतर पुढच्या दोन तासांत फुले बाजारात विक्रीसाठी पोच केली जातात. एक दिवस जर फुले तोडली नाही तर नुकसान होते. 


लग्नाचा सिझन असल्यामुळे सध्या सोनचाफ्याच्या फुलांना खूप मागणी आहे. गुलाबाला पर्याय म्हणून ही फुले साखरपूडा, लग्नात दिली जातात. पण, हीच फुले जेव्हा देवाच्या पायावर ग्राहक ठेवतात तेव्हा त्याचे मिळणारे समाधान खऱ्या अर्थाने आत्मिक समाधान देणारे असते, असे केतकी काशीद सांगतात. 



अन्य शेती काम करताना कधी ना कधी कंटाळा येतो. पण, सोनचाफ्याची शेती करताना ती भावना नसते. आजपर्यंत एकही दिवस शेतातील फुले ताेडायला आणि ती ग्राहकांपर्यंत पोहोचवायचा कधीच कंटाळा आला नाही. आम्ही सर्व जण साडेपाच वाजता उठून नऊ वाजेपर्यंत हे सर्व सोपस्कर करतो. दिवसाला दोन ते चार हजार रुपये मिळवतो. पण पैशापेक्षा समाधान अधिक असते अशी भावना काशीद कुटुंबीयांनी व्यक्त केली. 


फळ भाज्या, तांदुळ, उस, इतर भाज्या यासारखी पीके सर्वच शेतकरी घेतात. परंतु, आता शेतकरीदेखील शेतीत नवनवीन प्रयोग करू लागला आहे. सोनचाफा यालाही बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक शेती करून नफा मिळवावा असा संदेश काशीद कुटुंबियानी दिला आहे.