नाशिक : कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असताना नागरिक घरात न थांबता घराबाहेर पडत आहेत. वारंवार सूचना देऊनही नागरिक गंभीर नसल्याची बाब पुढे येत आहे. त्यातच कोरोना बाधितांच्या संख्यात झपाट्याने वाढ होत आहे. पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणेत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मंगळवारी एकाच दिवसांत ४४ रुग्ण वाढल्याने मालेगाव हादरले  आहे. त्यात दोन पोलिसांचा समावेश असल्यानं पोलीस दलात भीतीचं वातावरण सध्या पसरले आहे.  मुख्य वैद्यकीय अधिकारी बाधित झाल्याचा प्रकारही पुढे आला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे नागरिकांना आवरताना पोलिसांची दमछाक होत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा फैलाव या कात्रीत येथील प्रशासन अडकले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सेवा निवृत्त महापालिका आयुक्त जीवन सोनावणे यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. मालेगावला नवीन आयुक्त मिळाले असून त्यांच्यावर कोरोनाबाबत संदर्भात विशेष जबाबदारी असणार आहे. दरम्यान, मालेगाव महापालिकेचा आरोग्य विभाग क्वांरनटाइन करण्यात आला आहे.  मुख्य वैद्यकीय अधिकारी बाधित झाल्याने अनेक डॉकटर्स अॅक्टिव्ह आहेत. मालेगावात आतापर्यंत सात डॉक्टर कोरोना बाधित झाले असून अनेक परिचारीका भीतीच्या सावटात आहेत. या ठिकाणी नाशिकच्या शासकीय डॉक्टर्स आणि नर्सेस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


एसआरपीएफ तुकडीतील पोलिसांना रुग्णालयातून नकार


दरम्यान, मालेगावातील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांची जास्तीची कुमक मागविण्यात आली आहे. अमरावतीवरुन मालेगावमध्ये बंदोबस्तासाठी दाखल झालेल्या एसआरपीएफ तुकडीतील पोलिसांना टेस्टसाठी नाकारले गेले आहे. १२ जणांना त्रास होत असल्याने मालेगावमधील तीन रुग्णालयात तपासणीसाठी हे गेले होते. तिन्हीही ठिकाणी वेगवेगळे कारण देऊन तपासणीसाठी प्रतिसाद दिला गेला नाही. याबाबत पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे.


 रेड झोनमध्येच ड्यूटी लावत असल्याने एसआरपीएफच्या तुकडीत भीतीचे वातावरण आहे. पहिल्या दिवसांपासून रेड झोनमध्येच ड्युटी दिली जात असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.