मोठी बातमी: एसटी बसच्या पासला मुदतवाढ देण्याचा सरकारचा निर्णय
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: लॉकडाऊनच्या काळात प्रवास न करत आल्यामुळे प्रवाशांनी काढलेले एसटीचे पास फुकट जाऊ नयेत म्हणून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एसटीच्या मासिक आणि त्रैमासिक पासला मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या टाळेबंदी मध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पुर्णत: थांबवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाशांनी आपले मासिक/ त्रैमासिक पास काढले असतील, परंतु त्यांना टाळेबंदीमुळे प्रवास करणे शक्य झाले नसेल. अशा प्रवाशांना त्यांच्या मासिक/ त्रैमासिक पाससाठी, मुदतवाढ देण्यात येत असून ज्यांना या मासिक/ त्रैमासिक पासचा परतावा पाहिजे असेल त्यांना देखील तो परतावा देण्याची व्यवस्था एसटी महामंडळाने केल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
२२ मार्च २०२० पासून करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. परंतु, २२ मार्चपूर्वी एसटीने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी मासिक /त्रैमासिक पास काढले होते. एसटी बंद असल्याने त्यांना या काळात प्रवास करणे शक्य झाले नाही .अशा प्रवाशांच्या मासिक/ त्रैमासिक पासला सध्या मुदतवाढ देण्यात येत असून, ज्यांना आपला पास रद्द करून, उर्वरित रकमेचा परतावा हवा असेल, त्यांना देखील तो परतावा देण्याची सुविधा एसटी प्रशासनाने दिली आहे. त्यासाठी संबंधित प्रवाशांनी जवळच्या आगारात जाऊन आगार प्रमुखांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना, त्यांच्या मासिक/ त्रैमासिक पासला मुदतवाढ अथवा त्यांच्या पासचा उर्वरित परतावा रक्कम देण्याची व्यवस्था आगार पातळीवर करण्यात येईल, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.