एसटी कामगारांचा उर्वरित पगार केव्हा मिळणार; अनिल परबांनी दिलं उत्तर
मोठी बातमी.....
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यातील वाहतूक सेवा कोरोना व्हायरसचा कहर सुरु असतानाही अविरतपणे सुरु ठेवत आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या एसटी कामगारांचा पगार मात्र थकवण्यात आला होता. कमी पगार, त्यातही तो वेळेवर हातात न येणं अशा अनेक आर्थिक अडचणींचा सामना हे कामगार करत होते. काहींनी या संघर्षाला कंटाळून शेवटचं पाऊल म्हणून आत्महत्या करत जीवनही संपवलं. ज्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आणि कामगारांच्या पगाराबात मोठा निर्णय घेण्यात आला.
सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार एका तासात ळणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली. ज्यानंतर मंगळवारी त्यांनी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना त्यांचा उर्वरित २ महिन्यांचा पगारही देण्यात येणार असल्याचं सांगितलं.
एसटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर होता. पण, त्यांना पगार मिळालाच पाहिजे अशी माझीही आग्रही भूमिका होती असं म्हणत, महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीचं कारण त्यांनी पुढे केलं.
कर्मचाऱ्यांना एका महिन्याचं वेतन दिल्यानंतर आता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या चर्चेनंतर पहिल्या महिन्यामागोमाग उरलेल्या आणखी दोन महिन्यांचं वेतनही दिवाळीपूर्वी देण्यात येईल असं आश्वस्त करणारं वक्तव्य परब यांनी केलं.
अजित पवार यांनी एसटीला १ हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. ज्यामुळं एसटी रुळावर येईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. शिवाय कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली म्हणून पगार दिले असे नाही, तर मागील अनेक दिवस आपण स्वत: याबाबत बैठका घेत होतो असं म्हणत त्यांनी टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर दिलं.
पगार वेळेवर झाले नसले तरीही कर्मचाऱ्यांनी कृपया टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहनही त्यांनी केलं. शिवाय उरलेल्या दोन महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होईल, आज आम्ही यासाठी फाईल पुढे पाठवली आहे, दोन दिवसात हा पगार होईल अशा शब्दांत त्यांनी अतिशय महत्त्वाची घोषणा केली.