मुंबई : वेतन, अन्य खर्च भागवण्यासाठी एसटी महामंडळाने सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एसटीचे काही आगार, बस स्थानके  तारण ठेवण्यात येणार आहेत. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारचा निधी किंवा बँकेचे कर्ज हाच सध्या एकमेव पर्याय महामंडळासमोर आहे. त्यामुळेच बँकेचे कर्ज काढण्याचा विचार होत असल्याची माहिती परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी दिली. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्मचाऱ्यांच्या वेतनासह दैनंदिन खर्च भागवणेही कठीण झाले आहे. दिवसाला ६० ते ६५ लाख प्रवासी आणि २२ कोटी रुपये असलेली प्रवासी संख्या १० लाखांवर, तर उत्पन्न पाच ते सहा कोटींवर आले आहे. आतापर्यंत महामंडळाचे ३,५०० कोटी रुपये प्रवासी उत्पन्न बुडाले आहे.परिणामी, महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न जुलै महिन्यापासून अधिकच बिकट झाला आहे.


दरम्यान, जुलैचे वेतन ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मिळाले, तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे वेतन अद्यापही हाती आलेले नाही. त्यातच इंधन, टायर खर्चासह अन्य छोटे-मोठे खर्च असल्याने एसटी महामंडळाने राज्य सरकारकडून निधी घेण्यास सुरुवात केली. जुलै महिन्यापर्यंतचे वेतनही राज्य सरकारच्या निधीतूनच केले, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.