कोल्हापूर : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आज ज्या सुविधा मिळत आहेत, त्या एसटी कर्मचाऱ्यांसाठीही तंतोतंत लागू केल्या तर चित्र बदलू शकेल. दर महिन्याला त्यांच्या पदरात वेतन पडले पाहिजे. त्यांच्या घामाचा आणि मेहनतीचा मोबदला त्यांना वेळेत मिळायलाच पाहिजे, असे  प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या ५६ व्या राज्यव्यापी वार्षिक अधिवेशनात  बोलत होते. यावेळी त्यांनी आज एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी कामगारांची मागची पाच वर्षे परीक्षा होती. हा वर्ग सामान्य जनतेचा सेवेकरी आहे. राज्यात पंढरपूरच्या वारी दरम्यान उत्तम काम एसटी कर्मचाऱ्यांकडून केले जाते. ही माणुसकीची सेवा देणाऱ्यांकडे माणुसकीने पाहण्याची गरज आहे. त्याचवेळी शरद पवार यांनी नेहमीप्रमाणेच जोरदार टोलेबाजी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाकर रावते यांना बरं झालं बदललं, त्यामुळे आता कामगार खूष वाटत असल्याचे पवार म्हणाले. मागच्या अधिवेशनापेक्षा यावेळच्या अधिवेशनात अधिक उत्साह वाटत असल्याचा टोलाही त्यांनी रावतेंना लगावला.



प्रवाशी वाढले तर आजचे एसटीचे चित्र बदलेल. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना जे मिळते ते एसटी च्या कर्मचाऱ्यांना मिळाले तर अनेक प्रश्न मिटतील. एसटीच्या कर्मचाऱ्याना दोन दोन महिने पगार मिळत नसेल तर ती राज्यकर्त्यांची चूक आहे. येत्या आठ दिवसात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना वेळ असेल तेव्हा बैठक घ्या आणि त्या बैठकीला कामगार संघटनेला बोलवा. या बैठकीचे नियोजन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी करावे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री एकत्र बैठकीला आले की गरज असेल तर मलाही बोलवा, अशा सूचना पवार यांनी यावेळी केल्यात.


एसटीचे प्रश्न  नक्की सोडवणार - अनिल परब


माजी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याजागी आता परिवहनमंत्री म्हणून अनिल परब यांची वर्णी लागली आहे. अनिल परब कार्यक्रमाला उशीरा येऊनही पवारांनी त्यांची चांगलीच स्तुती केल्याने परबही आनंदले. आपण शरद पवार यांचे भक्त असल्याचं परब म्हणालेत. दरम्यान, पहिल्याच दिवशी कामागाराचे प्रतिनिधी यांना बोलावून घेतले. एस टी तोट्यात असेल तर कामगारांना उपाशी ठेवण ही माझी भूमिका नाही. माझा विविध प्रश्नांवर अभ्यास सुरू आहे.


एसटी स्वतःची असली पाहिजे, अशी माजी भूमिका आहे. कारण एसटी ही महाराष्ट्राची लाईफलाईन आहे. एसटीच्या  काही गोष्टींत बदल करण्याची गरज आहे. नेमकं काय बदल करायचे हे तुम्हाला सांगेन ते बदल करू. महाविकास  आघाडीचे  सरकार एसटीचे प्रश्न  नक्की सोडवेल. मी शरद पवार यांचा भक्त आहे. त्यांनी एसटीचे प्रश्न सोडवण्यासाठी मार्गदर्शन करावे. मागच्या आंदोलनात ज्या कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल झाले; ते गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री यांना भेटू, असे आश्वासन अनिल परब यांनी यावेळी दिले.