मुंबई : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात अजूनही तोडगा निघालेला नाहीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावतेंशी फोनवरून चर्चा केली. पण, उद्धव ठाकरेंची शिष्टाईही फोल ठरल्याचं चित्र सध्या दिसतंय.


११०० कोटींची पगारवाढ देण्याचा प्रस्ताव दिवाकर रावते यांनी कर्मचारी संघटनासमोर ठेवला. मात्र, हा प्रस्ताव संघटनांना मान्य नाहीये.


या प्रकरणी मुख्यमंत्र्यांशीच चर्चा करू असा पवित्रा संघटनांनी घेतला होता. पण, आता अंतरिम दिलासा दिल्याशिवाय संप मागे घेणार नाही, असं संघटनेनं स्पष्ट केलंय.


एसटी संपात तोडगा काढण्यासाठी न्यायालयानं सरकारचे तसेच कर्मचारी संघटनेचेही कान उपटले आहेत. गेल्या वेळी आश्वासन दिल्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आतापर्यंत उच्चस्तरीय समिती का नेमली नाही? संप मिटवण्यासाठी तुमच्याकडं काय ठोस धोरण आहे? असे तिखट सवाल न्यायालयानं सरकारला केले आहेत.


येत्या सोमवारी उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल. त्यामध्ये अर्थ सचिव, परिवहन सचिव, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांचा समावेश असेल, असं सरकारच्या वतीनं न्यायालयात स्पष्ट करण्यात आलं आहे.