मुंबई  : एसटी महामंडळाचं (Maharashtra State Road Transport Corporation) राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं, या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसांपासून राज्यात कर्मचाऱ्यांनी संपावर आहेत.  काही ठिकाणी या संपाला हिंसक वळण लागलं आहे, तर काही ठिकाणी मात्र एसटी कर्मचारी कामावर परतले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणखी किती दिवस सुरू राहील आणि सरकार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला एसटी कर्मचाऱ्यांचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
दरम्यान, तीन चार महिला एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्रालयासमोर आंदोलन केलं. एवढंच नाही तर त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न देखील केला. एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करा अशी मागणी घेवून  महिला एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्रालया समोर आंदोलन केलं. पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतले आहे. 



एसटीच्या संपाबाबत आज किंवा उद्या चर्चा होण्याची शक्यता
तर दुसरीकडे एसटीच्या संपाबाबत आज किंवा उद्या आंदोलनात सहभागी झालेले भाजपचे नेते, परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. शनिवारी सह्याद्रीवर भाजप नेत्यांमध्ये आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी या बैठकीतही संप मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. 


कोर्टाच्या आदेश महत्त्वाचा
या चर्चेनंतर भाजपचे नेते आझाद मैदानावर बसलेल्या एसटी कामगारांशी चर्चा करून शासनाला आपलं म्हणणं कळवणार आहेत. यासाठी आज किंवा उद्या बैठक होण्याची शक्यता आहे. कामगार तातडीनं विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत, तर कोर्टाच्या आदेशानुसार समितीचा अहवाल आल्यानंतरच विलिनीकरण होईल अशी सरकारची भूमिका आहे.  


सोलापूर-सांगलीतील संपाचा आढावा 
सोलापुरातील बस स्थानकावरून कार्तिकी वारीला जाण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते. मात्र, एस.टीचा संप सुरू असल्याने विविध ठिकाणांहून आलेल्या भाविकांची तारांबळ उडताना दिसतेय. 


सांगली जिल्ह्यातील मिरज -कर्नाटक सीमेवर एस.टीवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चालकाने अज्ञाताविरुद्ध  तक्रार दाखल करण्यात आली आहे. संप मोडीत काढण्यासाठी महामंडळाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.  दगडफेकीत एस.टी.चं 6 हजार रुपयांचं नुकसान झालं आहे.