ST Strike : उद्या कामावर या, नाही तर घरीच रहा; एसटी कर्मचाऱ्यांना इशारा
संपकरी कामगारांना अनेक वेळा मुदत देण्यात आली. पण, आता मुदत नाही थेट कारवाई, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलाय.
मुंबई : एसटी संपकरी कामगारांना कामावर येण्यासाठी अनेकदा आवाहन करण्यात आले. आज त्यांचा मुदत देण्यात आलेला अखेरचा दिवस. त्यामुळे जे कामगार कामावर हजर झाले नाहीत त्यांच्यावर सेवासमाप्तीची कारवाई करण्यात येणार अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलीय.
उद्या जे कामगार कामावर येणार नाहीत त्यांना कामाची गरज नाही असे समजून त्यांची सेवा समाप्त करण्यात येणार आहे. कमगारांनी संप करताना ज्या मागण्या केल्या त्यातील अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. कुणाला किती पैसे देण्यात आलेत याची माहितीही कामगारांना देण्यात आली होती. न्यायालयातही राज्य सरकारने सर्विस्तर माहिती दिली आहे.
त्यामुळे वेळोवेळो आवाहन करूनही जे कामगार हजर होत नाहीत त्यांच्यावर नियमानुसार निलंबन, बडतर्फी आणि सेवासमाप्ती अशी जी काही कारवाई असेल ती केली जाईल. कांट्राई कामगार भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. जे त्याच्या निकषात बसतील त्यांना एसटी सेवेत भरती करण्यात येईल.
संप काळातही राज्यात पाच हजार एसटी सुरु होत्या. यात्रा, मुलाच्या परीक्षा, सण आदी सुरु आहेत. कोकणात होळीसाठी ज्या पद्धतीने गाड्या फिरविण्यात आल्या त्याच रोटेशन पद्धतींचे नियोजन केले आहे. नव्या नियोजनामुळे आता किमान ८ हजार बस गाड्या रस्त्यावर धावतील असेही ते म्हणाले.