उस्मानाबाद : उस्मानाबादचे (Osmanabad) माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार आणि उस्मानाबाद लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून बदनामी केल्याप्रकरणी उस्मानाबाद पोलीस दलातील दहा पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध राज्य मानवाधिकार आयोगाकडे (State Human Rights Commission) तक्रार दाखल (complaint lodged) करण्यात आली आहे. त्यामुळे उस्मानाबाद पोलीस दलात खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उस्मानाबादमध्ये 2020 मध्ये 10, 11 आणि 12 जानेवारी या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते. या साहित्य संमेलनात झी २४ तासचे तत्कालीन रिपोर्टर मुस्तान मिर्झा यांना पोलिसांनी मारहाण केली होती. या मारहाण प्रकरणी पत्रकार सुनील ढेपे यांनी सोशल मीडियावर सडेतोड लेख लिहून तत्कालीन पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांचे वाभाडे काढले होते. 'बिहारी बाबू , आता तरी जागे व्हा ' या शीर्षकाखाली हा लेख लिहीण्यात आला होता.


ढेपे यांचा लेख माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी सोशल मीडियावर शेअर केला होती.  त्यामुळे पोलिसांनी चिडून पत्रकार सुनील ढेपे यांच्यासह सुभेदार यांच्याविरुद्ध आनंद नगर पोलीस ठाण्यात  14 जानेवारी 2020 रोजी  पोलीस ( अप्रितीची भावना चेतवने)  कायदा 1922 चे  कलम 3 अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात  दोषारोपपत्र  दाखल केले होते. हा खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंध महाराष्ट्रात पत्रकारांनी संताप व्यक्त करून निषेध व्यक्त केला होता. 


या एफआयआर आणि चार्जशीटला पत्रकार सुनील ढेपे व  बाळासाहेब सुभेदार यांनी  मुंबई उच्च न्यायालयाच्याच्या औरंगाबाद खंडपीठात 16 फेब्रुवारी 2021 रोजी आव्हान दिलं होते. कोरोनामुळे या आव्हान याचिकेची सुनावणी लांबणीवर पडली होती. पण दीड वर्षानंतर या आव्हान याचिकेचा 3 ऑगस्ट 2022 रोजी निकाल लागला. न्यायालयाने एफआयआर आणि चार्जशीट रद्दबातल ठरवले आहे आणि पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. 


राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार


बाळासाहेब सुभेदार आणि पत्रकार सुनील ढेपे यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून बदनामी केल्याप्रकरणी उस्मानाबाद पोलीस दलातील दहा पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


यामध्ये सायबर पोलीस स्टेशनचे तत्कालीन सपोनि ( सध्या तामलवाडी पोलीस स्टेशन ) सचिन अशोक पंडित, आनंद नगर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एस.एस. चव्हाण , पोलीस उपनिरीक्षक क्रांती सुधाकर ढाकणे, पो. कॉ.विठ्ठल सुखदेव गरड , पो. कॉ. माधवी म्हाळाप्पा व्हदरगंडे, पो. कॉ.अरविंद अंकुश ढेकणे, पो. कॉ. राहुल नागनाथ नाईकवाडी, पो. कॉ.मनोज महादेव  मोरे, पो. कॉ. सुनील सुखदेव मोरे, पो. कॉ. एम. के. कुलकर्णी यांचा समावेश आहे.


तत्कालीन पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या सांगण्यावरून सायबर पोलीस स्टेशनचे सपोनि सचिन अशोक पंडित यांनी आनंद नगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. तर आनंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस.एस. चव्हाण यांनी गुन्हा नोंद केला होता. उर्वरित आठ पोलीस कर्मचाऱ्याचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करताना जबाब नोंदवण्यात आले होते. विशेष म्हणजे यातील अनेकांनी पोस्ट देखील वाचली नव्हती. दरम्यान राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर उस्मानाबाद पोलीस दलात खळबळ उडाली आहे.