Rain Update : रविवारपासूनच मुंबई, कोकणासह राज्यातील इतर भागांमध्ये पावसानं दमदार बँटिंग केल्याचं पाहायला मिळत आहे. रविवारी सकाळच्या सुमारास सूर्यनारायणाचं दर्शन काही वेळासाठी झाल्यानंतर लगेचच काळ्या ढगांची चादर मुंबई आणि उपनगरांवर पसरल्याचं दिसून आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायंकाळच्या सुमारास या भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. कोकण किनारपट्टी भाग आणि उर्वरित परिसरातही पावसाचीउपस्थिती पाहायला मिळाली. तिथं रायगडमध्ये पावसानं चांगलाच जोर पकडला असून, अनेक गावांना याचा तडाखाही बसताना दिसत आहे. 


बंगालच्या खाडी परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाच्या मध्यम ते तीव्र स्वरुपाच्या सरी कोसळत आहेत. विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत हा पाऊस पोहोचला असून, जनजीवनावर याचे परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करत पावसाची सद्यस्थिती नेमकी कशी आहे, यासंदर्भातील माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली.




येत्या 24 तासांत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, पनवेलसह राज्याच्या कोकण पट्ट्याला पावसाचा जोर अनुभवता येणार आहे. दरम्यान, अनंत चतुर्दशीनंतर गावाकडून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या अनेक चाकरमान्यांनाही पावसाच्या तडाख्यामुळं प्रवासात काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. 


सहसा सध्यच्या काळात पावसाचा परतीचा प्रवास सुरु होतो. पण, देशाला यंदाच्या वर्षी इतक्यात पावसापासून उसंत मिळणार नसल्याचं दिसत आहे. बंगालच्या खाडी भागात मोसमी चक्रीवादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळं पूर्व, मध्य आणि पश्चिम भारतात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.