दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प उद्या दुपारी दोन वाजता सादर केला जाणार आहे. 2014 साली सत्तेवर आलेल्या भाजपा-शिवसेना युती सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्पात काही लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे फेब्रुवारी महिन्यात राज्य सरकारने मांडलेला अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प होता. त्यामुळे अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार विधानसभेत राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन या अर्थसंकल्पात विविध घटकांना खूश करण्यासाठी काही घोषणा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेतही दिले असून धनगर समाजाला अर्थसंकल्पात दिलासा देण्याचेही संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.



याशिवाय निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठीही या अर्थसंकल्पात विशेष घोषणा असण्याची शक्यता आहे. राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्तांसाठीही या अर्थसंकल्पात मदतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.


राज्यातील दुष्काळग्रस्त कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये तर बागायत शेतकर्‍यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत देण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. त्याबाबत अर्थसंकल्पात काय असेल ? याबाबतही उत्सुकता आहे.